अग्निमांद्य (DYSPEPSIA)

साधारणपणे प्रौढ माणसास जडणारा हा आजार आहे. पुष्कळ दिवसापर्यत एकसारखे अजीर्ण होत राहिल्यास अग्निमांद्याचा विकार जडतो. चहा, कॉफी, तंबाखु किंवा मद्य यांचे अतिसेवन करणे किंवा पचनास जड असलेले अन्न रोजचा आहारात समाविष्ट होणे या कारणाने भूक मंदावते व अग्निमांद्याचा विकार होतो. अग्निमांद्यामध्ये तोंडास चव नसते. जठर रस कमी प्रमाणात सुटतो. त्यामुळे बरेचसे अन्न पचन न होता आमाशयात पडून राहते. ते तेथे सडते व त्यापासून आंबट ढेकरा येतात. अग्निमांद्यातील लक्षणे बहुतांशी अजीर्णातील लक्षणाप्रमाणेच असतात पोटात दुखते. पोटात वायू धरतो. घसा जळजळतो. मळमळ होते. कधी कधी ओकाऱ्या ही होतात. तहान फार लागते. शरीर अशक्त आणि मन उदास होते. कशातही मन रमत नाही. छाती धडधड करते. पोटात व घशात जळजळते. तोंडास पाणी येते. तोडावाटे घाण वास येतो. जीभ तांबडी दिसते.

उपचार –

आमाशयात (पोटात) सडलेले अन्न असेल व ते सारखे डजडजत असेल तर घशात बोटे घालून उलटी करवावी व ते काढून टाकावे. सकाळी एक-दोन घोट कोमट पाण्यात चमचाभर खाण्याचा सोडा मिसळून रोज नियमाने काही दिवस घेत जावा. मलावरोध असेल तर सोनामुखीचे पाने व मणुका यांचा चहा घ्यावा. अन्न हलके व प्रवाही देत जावे. दुध, ताक, भात, बिस्कीटे देण्यास हरकत नाही. गोड पदार्थ तूप अथवा तेल यामध्ये तळलेले पदार्थ वर्ण्य करावेत.

अग्निमांद्याच्या विकारात खालील दिलेली अनुभविक औषधे उपयोगी पडतात.

आयुर्वेदिक औषधामध्ये-

१) हिंगाष्टक चूर्ण

२) भास्करलवण चूर्ण ही दोन औषधे अग्निमांद्यावर नावाजलेली ओषधे आहेत. प्रत्येक जेवणानंतर यांच्यापैकी कोणतेही एक औषध एक चमचा, एक घोटभर पाण्यात मिसळून दिवसातून दोन वेळा घेत जावे.

३) आमपाचक वटी 150mg

४) जीरकादि चूर्ण 1gm दिवसातून दोन वेळा जेवणानंतर गरम पाण्यात घ्यावे.

५) शंखभस्म

६) अग्नितुंडी

७) अग्निकुमार या औषधांचा योग्य त्या अनुपानामधून उपयोग करावा.

८) आरोग्य वर्धिनी 1 गोळी दिवसातून तीन वेळा घ्यावी.

९) अभयारिष्ट दोन चमचे दिवसातून तीन वेळा द्यावे.

आहार – सर्व साधारण पणे आहारात ताक, भात, अमसूल, लसूलण, लिंबू, आले, शेंदेलोन व पचनास हलके असलेले इतर अन्नपदार्थ सेवन करावेत. शरीर श्रम करू नयेत.

वरील कुठलाही उपाय करण्या अगोदर किंवा दिलेली औषधे तज्ञांचा सल्ला घेऊनच घ्यावीत.

Leave a Comment