आमाशय दाह (गॅस्ट्रायटीस) हा रोग गॅस्ट्रो या रोगापासून अगदी भिन्न आहे, गॅस्ट्रो हा सांसर्गिक (एकापासून दुसऱ्याला होणारा) रोग असून त्याच्या साथी येत असतात. आमाशय दाह व गॅस्ट्रो या रोगांच्या उपचारातही फरक आहे. अतिशय तिखट अथवा पचण्यास अयोग्य असे पदार्थ खाल्ल्याने आमाशयाचा दाह होतो. रोगामुळे अशक्त झालेल्या आमाशयाची पचन शक्ती क्षीण झालेली असते अशा स्थितीत पचनास अयोग्य असे अन्न पोटात गेले तर ते पचन न होता तसेच राहिल्याने सडून जाते व आमाशयाचा दाह होतो.
लक्षणे
आमाशयाच्या दाहामध्ये पोटात दुखते, पोट फुगते, पोटाला स्पर्श सहन होत नाही. पोटाबरोबर छातीही दुखू लागते. छातीत जळजळते. तोंडाला चव नसते. भूक मंदावली तरी तहान मात्र अधिक असते. जिभेवर पांढरा थर दृष्टीस पडतो. तोंडातून लाळ अधिक सुटते. आंबट वायुचे ढेकरे येतात. मळमळते, ओकाऱ्या होतात. ओकारीवाटे सुरूवातीस अन्न पडते. अन्नाबरोबरच चिकट, बुळबुळीत लाळीसारखा पदार्थ पडतो. काही वेळा त्या बरोबर रक्तही पडते. नाडी जलद चालते. अंगात ज्वर १०१ ते १०३ अंशापर्यंत असतो डोके दुखते जीव घाबरा घाबरा होतो. चिकित्सा आमशयात सडलेले अन्न असेल व त्याने आमाशयाचा दाह होत असेल तर घशात बोटे घालून ओकारी करावी. विष अथवा विषारी अन्न किंवा कळंकटलेले अन्न पोटात गेले असेल तर भरपूर मीठ घातलेले पाणी पिण्यास देऊन ओकारी करवावी. आमाशयातील त्रास देणारे पदार्थ निघून गेल्याने आराम वाटतो. पोटात पाण्याशिवाय काहीही देऊ नये शरीरातून बाहेर पडलेल्या द्रव पदार्थाचा समतोल राखण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पोटात गेले पाहिजे मीठ साखर आणि पाणी या निर्जलन पेयाचा फार चांगला उपयोग होतो.
आयर्वेदिक औषधामध्ये –
१) आमलक्यादि चूर्ण १ ग्रॅम
२) कर्पुरादिचूर्ण 500mg
३) दाडिमादिचूर्ण १ ग्रॅम दर वेळेस प्रमाणे दिवसातून दोन वेळा द्यावे.
४) पंचकोलासव
५) द्राक्षासव दर वेळेस चार चमचे प्रमाणे पाण्यात मिसळून दिवसातून दोन वेळा जेवणापूर्वी घेत जावे.
(वरील औषधे हे तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच घ्यावीत.)
योग्य आहार विहार- अंथरूणावर पडून भरपूर विश्रांती घ्यावी. दूध, चहा, कॉफी, सरबत यासारखे पातळ पदार्थाचा आहार असावा. आजार थांबल्यानंतर मऊ भात व तूप देण्यास हरकत नाही. दोन तीन दिवसानंतर सर्व पदार्थ हळूहळू खाण्यास द्यावेत. तिखट, आंबट व कठीण पदार्थ मात्र निदान पंधरा दिवस तरी खाण्यास देऊ नयेत.
वरील कुठलाही उपाय करण्या अगोदर किंवा दिलेली औषधे तज्ञांचा सल्ला घेऊनच घ्यावीत.