आम्लपित्त (Hyper Acidity)

आमाश्यात पाचक रस अधिक प्रमाणात झाला म्हणजे त्यास आम्लपित्त असे म्हणतात. आम्लपित्त होण्याची बरीच कारणे असतात, त्यात आहार-विहार, आपली चुकीची दिनचर्या आणि सतत ताण घेणे असे कारणे असू शकतात.

आम्लपित्ताचे लक्षणे(Acidity che Lakshane):-
तोंडाला अधिक प्रमाणात पाणी सुटते घशाशी आंबट पित्त येते. छातीत जळजळ करते. तोंडावाटे आंबट पित्ताच्या गरळ्या येतात. आंबट व कडू ओकारी होते. जेवणानंतर थोडेसे बरे वाटते पण दोन तीन तासानंतर पोटात दुखावयास सुरूवात होते. खाण्याचा सोडा अथवा साखर न घालता गरम दूध घेतले तर पोट दुखणे तात्पुरते थांबते.
अजीर्ण व अग्निमांद्यामध्ये जठर रस कमी प्रमाणात स्त्रवत असल्याने अन्न पदार्थाचे नीट पचन होत नाही व अन्न सडण्याची क्रिया होते तर आम्लपित्त व आमाशयव्रण (गॅस्ट्रिक अल्सर) मध्ये जठर रस अधिक प्रमाणात स्त्रवत असल्याने छातीत, घशात जळजळ करणे व आंबट रसाच्या गुळण्या येणे ही लक्षणे होतात. त्याच प्रमाणे आम्लपित्तात आणि आमशयव्रणात (अल्सरमध्ये) फरक असा आहे की आमाशयव्रणात (अल्सरमध्ये) पोटावर आमाशयाचे जागी दाबून पाहिले तर दुखवा होतो. तसा आम्लपित्तात होत नाही. आमाशयव्रणात कधी कधी ओकारीवाटे रक्त पडते. पण आम्लपित्तामध्ये तसे कधी होत नाही.

आम्लपित्त आणि हृदय रोग (Acidity aani heart Disease):-
आम्लपित्तामध्ये छातीत जळजळ व बेचैनी होत असल्यामुळे काही लोक तो हृदयरोग आहे असे समजून घाबरून जातात. पण ह्दय रोगामध्ये ही दोन लक्षणे समान असली तरी आम्लपित्ताची इतर लक्षणे ध्यानात घेतली तर हृदयरोग व आम्लपित्त यांच्यातील फरक कळून येतो.

आम्लपित्तावर उपचार (Acidity vr upchar):-

आम्लपित्ताचा विकार औषधोपचारापेक्षा आहार व विहार याचे काटेकोर पालन केल्याने अधिक लवकर बरा होतो. आणि खाण्यापिण्यात जीभ मोकळी सोडली व शरीर अगदीच आरामात ठेवले तर औषध-उपचाराला ही न जुमानता त्या आजाराचे आमाशयव्रणात (अल्सरमध्ये) रूपांतर होते. हा आजार चिंता ग्रस्त लोक, बैठा धंदा करणारे, ऐषआरामात जीवन जगणारे, आळशी, तरूण स्त्रीया यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. आम्लपित्त आजार असणाऱ्या लोकांनी रोज मोकळ्या हवेत फिरावयास जाण्याचा परिपाठ ठेवावा. तिखट पदार्थ व तळलेले पदार्थ खाणे पूर्णपणे वर्ज्य करावे. उपवास करणे शक्यतो टाळावे. तुरीची दाळ पित्त विकाराचा उठाव करते व हरभऱ्याची गुबारा धरते म्हणून त्यांचे केलेले पदार्थ अतिप्रमाणात सेवन करू नये. मुगाची दाळ सेवन करण्यास हरकत नाही. पचणास कठीण असणारे पदार्थ शिळे अन्न सेवन करू नये. जेवणानंतर दीड-दोन तासाने पाणी पिण्याचा परिफठ ठेवावा. त्याच प्रमाणे सकाळी तोंड धुणे झाल्यानंतर चहा घेण्यापूर्वी पाणी पीत जावे, आम्ल पित्ताचा त्रास जाणवू लागला तर एक कपभर थंड दुध प्यावे, त्याने तात्पुरता आराम वाटतो. दोन वेळा भरपूर जेवण करण्यापेक्षा तेच जेवण तीन वेळा करून खावे.

आम्लपित्तासाठी आयुर्वेदिक औषधे (Ayurvedic medicine for Acidity) :-
१) अविपत्तीकर चूर्ण एक ग्रॅम औषध कोमट पाण्याबरोबर रात्री झोपताना द्यावे किंवा
२) त्रिफळा चूर्ण १ ग्रॅम कोमट पाण्याबरोबर रात्री झोपताना द्यावे.
३) अभयारिष्ट दर वेळेस चार चमचे दिवसातून दोन वेळा द्यावे.
४) सुवर्ण माक्षिक 200mg + सुवर्ण सूतशेखर 200mg मधात मिसळून दिवसातून दोन वेळा द्यावे.
५) प्रवाळ पंचामृत
६) कामदुधा
७) प्रवाळ भस्म (चंद्रपुटी) यापैकी कोणतेही एक औषध 200mg दिवसातून दोन वेळा मोरावळ्याच्या पाकातून सेवन करावे. दुधाचे थोडे थोडे पण अधिक प्रमाणात सेवन करणे व मोकळ्या हवेतील फिरणे आम्लपित्ताचे विकारास कमी करणारे आहेत.

👉👉👉पित्तावर विजय मिळवा, घरगुती उपायाने

वरील पैकी कुठलाही प्रयोग करण्याअगोदर किंवा औषधे घेण्याअगोदर तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

Leave a Comment