ताकाचे प्रकार खालील प्रमाणे:-
१ दधिमण्ड
२ मथित (मट्ठा)
३ तक्र
४ उद्भिवत
५ छच्छिका (ताक)
याप्रकारे ताकाचे पाच प्रकार पाडण्यात येतात, तसेच त्यांच्या वेगवेगळ्या गुणधर्माप्रमाणे वेगवेगळ्या रोगांवर त्यांचा उपयोग केला जातो.
१ दधिमण्ड:-
दह्यात पाणी घातल्याशिवाय जे ताक हलवले जाते त्या ताकाला ‘ दधिमण्ड ‘ म्हणतात. हे ताक ग्राही, मळ रोखणारे, दीपक, पाचक व शीतल असते. ते वायुनाशक पण कफवर्धक असते. हिंग, जिरे व सैंधव घालून हे ताक घेतले असता ते वायुनाशक, अर्श व अतिसार दूर करणारे, रूचि वाढविणारे, पुष्टि देणारे, बलवर्धक, नाभीपासून खालील पोटाचा शूळ बंद करणारे असते. गूळ घालून तयार केलेले दधिमण्ड हे मूत्रकृच्छवर उत्तम उपाय आहे व चित्रक घातलेले दधिमण्ड पांडुरोगावर श्रेष्ठ उपाय आहे. साखरयुक्त दधिमण्ड ताकाचे गुण आंब्याच्या रसाइतकेच श्रेष्ठ आहेत.
२ मथित (मट्ठा)
दह्यावरचा चिकट भाग काढून ते हलवले असता त्याला ‘ मथित ‘ (मट्ठा) असे म्हणतात. मठ्ठा वायू व पित्तहारक, प्रसन्नता देणारा व कफ व पित्तनाशक असतो. याव्यतिरिक्त उष्णतेपासून होणारे जुलाब, अर्श व संग्रहणीवर ते हितकारक असते.
३ तक्र
दह्यात त्याच्या चौथ्या भागाइतके पाणी घालून बनवले जाणाऱ्या ताकाला ‘ तक्र ‘ म्हणतात. तक्र मलास रोखणारे, तुरट, आंबट, पाकाने व रसाने मधुर, हलके, उष्णवीर्य, अग्निदीपक, मैथुनशक्तिवर्धक, तृप्तिदायक व वायुनाशक आहे. ते हलके व मलास रोखणारे असल्याने ग्रहणी असणाऱ्या रुग्णांना पथ्यकारक आहे. तसेच ते पाकाने मधुर करणारे असल्याने पित्तप्रकोप करत नाही व तुरट उष्णवीर्य व रुक्ष असल्याने कफ दूर आहे.
४ उद्भिवत
दह्यामध्ये अर्धा भाग पाणी घालून जे ताक तयार करण्यात येते त्याला ‘ उदश्वित ‘ असे म्हणतात. उदश्वित कफकारक, बलवर्धक व आमनाशक असते.
५ छच्छिका (ताक)
दह्यामध्ये अधिक पाणी घालून, हलवून, त्यातून लोणी काढून, पुन्हा पाणी घालून जे बरेच पातळ केले जाते त्याला ‘ ताक ‘ म्हणतात. थोडक्यात ज्या ताकातील सर्व लोणी संपूर्णपणे काढून घेतले जाते ते ताक आरोग्यदायक व हलके असते . ज्या ताकातील लोण्याचा थोडासा भाग काढून घेतलेला असतो, असे ताक जड, वृष्य व कफकारक असते. आणि ज्यामधून थोडेही लोणी काढलेले नसेल ते ताक जड, पौष्टिक व कफवर्धक असते. दधिमण्डापेक्षा मथित (मठ्ठा), मट्ट्यापेक्षा ताक पचण्यास हलके असते.
सारांश दुधापासून बनणाऱ्या सर्व पदार्थांमध्ये ताक पचण्यास हलके असते.
वरीलपैकी कुठलाही प्रयोग करण्याअगोदर तज्ञांचा सल्ला घ्यावा.