एड्स बद्दल आयुर्वेद काय म्हणते ?

प्रतिलोम क्षय


AQUIRED IMMUNO DEFFICIENCY SYNDROME
ज्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवील ती व्यक्ती पाहता पाहता जळून भस्म होनार असा भगवान महादेवाच्या वरदानामुळे भस्मासुराला अशी काही शक्ती प्राप्त झाली होते. पुराण ग्रंथातून भस्मासुरासंबंधी अशी एक कथा सांगण्यात येते. आधुनिक काळात एड्स या रोगाला देखील तशीच शक्ती प्राप्त झाली आहे. या रोगांच्या संसर्गात जो कोणी येईल तो झिजून झिजून मरण पावल्याशिवाय रहात नाही. मागच्या काळात प्लेग, कॉलरा, देवी, इन्फ्लुएंझा इत्यादी रोगांच्या साथी आल्या म्हणजे मरणाच्या भितीने लोकांची मने धास्तावून जात असत. विज्ञानाच्या प्रगतीमुळे सुदैवाने काही रोगांच्या प्रतिबंधक लसींचा शोध लागला. त्यामुळे प्लेग, देवी इत्यादी रोगांचे पार उच्चाटन झाले आहे. पण एड्स या रोगाला प्रतिबंध करणारी लस अथवा रोग झाल्यावर त्यावर गुणकारी औषध अद्याप तरी सापडले नाही. एड्स हा एक विषाणुमुळे सुरू होणारा रोग आहे. त्याने आपल्या शरीरात प्रवेश केला की, आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती क्षीण होते. आपल्या रक्तात तांबड्या व पांढऱ्या रक्तपेशींचा समावेश असतो. त्यातील पांढऱ्या रक्तपेशी बाहेरून शरीरात येणाऱ्या कोणत्याही रोगजंतूंशी लढा देऊन त्यांना नष्ट करीत असतात. एड्स रोगाचे जंतू पांढऱ्या रक्तपेशीवरच हल्ला करून आपले रक्षण करणाऱ्या पांढऱ्या रक्तपेशी क्षीण होतात. त्यामुळे माणसाला कोणताही आजार झाला की त्याची रोग प्रतिकार शक्ती क्षीण झाल्याने तो रोग उग्र स्वरूप धारण करतो. हा रोग एड्सने पछाडलेल्या व्यक्तीच्या रक्त, वीर्य व लाळ यांच्या मार्फत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो. नैसर्गिक शरीर संबंधात हे विषाणू वीर्यामार्फत स्त्रियांकडे जाऊ शकतात . तर अनैसर्गिक (समलिंगी) संबंधात होणाऱ्या जखमातील रक्तामुळे व वीर्यामुळे एका पुरुषाकडून दुसऱ्या पुरुषाकडे जातात. मादक पदार्थ शिरेवाटे घेणारे लोक इंजेक्शनची पिचकारी व सुई निर्जतूक करण्याची दक्षता घेत नाहीत. त्यामुळे एका मादक व्यक्तीकडून हा रोग दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे पसरतो. रक्तदानाची गरज असलेल्या रोग्याला द्यावयाचे रक्त जर विषाणूयुक्त असेल तर त्या वाटे त्या रोग्यात एड्स रोगाच्या जंतूचा प्रवेश होतो.

रोगनिदान :
१) एलिसा टेस्ट ( ELISA- TEST – Enzyme linked Immunosorbent Assay ) हे याचे पूर्ण नाव आहे.
२) वेस्टर्न ब्लॉट (Westerm Blot) या दोन्ही पद्धतीने रक्त तपासणीत प्रयोगशाळेमध्ये रोग निश्चिती करता येते.

लक्षणे :
एड्स हा रोग शरीर झिजविणारा रोग असल्याने त्याची लक्षणे ही हळूहळू उग्र रूप धारण करतात. रोग्याचे वजन हळूहळू कमी होत जाते. बारीकसा ताप सतत अंगात भरलेला असतो. रात्री घाम येतो. दिवसेंदिवस थकवा वाढत जातो. मधून मधून पाण्यासारखे जुलाब होतात. कधी कधी तोंडात व घशात बुरशी येते. एड्स रोगावर गुणकारी औषध अथवा प्रतिबंधक लस यांचा शोध लागला नाही.

त्यामुळे या रोगापासून बचाव (प्रतिबंध) करणे एवढेच आपल्या हाती आहे. त्यासाठी खालील गोष्टींचे पालन करावे .
१) हा रोग मुख्यत्वे एडस् दुषित रक्ताने अथवा वीर्याने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत असल्याने स्वैर वागणुकीच्या व्यक्तीशी शय्यासोबत करू नये.
२) एड्स रोग झालेल्या स्त्रीने गरोदरपण येऊ देऊ नये. जन्म घेणाऱ्या बालकास तो रोग होण्याची भिती असते. रोगग्रस्त मातेने आपले दूध मुलास पाजले तर बाळाला या रोगाची बाधा होते.
३) कुठलेही इंजेक्शन घेताना इंजेक्शनची पिचकारी व सुई निर्जतूक झाली असल्याची खात्री करून घ्यावी.
४) रक्तदानाची गरजच असेल तर ते रक्त एड्स विषाणू रहीत असल्याची खात्री करून घ्यावी. बारीक सारीक कारणांसाठी रुग्णास रक्तदान देऊ नये.
५) एकमेकाचे वापरण्याचे कपडे, टॉवेल, टूथब्रश, दाढी करण्याचे रेझर्स व ब्लेडस् इत्यादी वस्तू एकमेकास देऊ नयेत.
६) निती नियमास अनुसरून व संयमित स्वरूपाची वागणूक असावी.

आयुर्वेद शास्त्रामध्ये एडस् या रोगाला मिळते जुळते असलेले है असे रोगाचे नाव आढळून येत नाही पण त्या रोगाची कारणे लक्षणे यावरून त्याचे नाव प्रतिलोमक्षय आहे असे म्हणण्यास हरकत नाही. चरकाचार्य सुश्रूत इत्यादी आयुर्वेदाचार्यानी ग्रंथातुन या संबंधीचे संदर्भ पहावयास मिळतात. भाव प्रकार ग्रंथामध्ये प्रतिलोमक्षयाची कारणमिमांसा सांगतांना म्हटले आहे की,

तिर्यग्योनावयोनीवा दृष्टयोनी तयैवच ।। उपदंशास्तथा वायौ कोषः शुक्र मुखक्षयः ॥

याचा अर्थ असा की, जर मानवाने गाय, म्हैस, घोडी, गाढवी, कुत्री इत्यादी पशूच्या योनीतून मैथून क्रिया केली किंवा मानवाच्या नैसर्गिकपणे असलेल्या योनीला सोडून मुख, गुदद्वार इत्यादी अनैसर्गिक मार्गाने मैथुन क्रिया केली किंवा समलिंगी संबंध केला तर गरमी, परमा, वातप्रकोप, ज्ञानतंतूंची क्षीणता अशा प्रसंगीच्या शुक्रक्षयामुळे घडून येते. अतिशुक्र क्षणमुळे ओज क्षय घडून येतो. ओज धातू तर मानवाच्या शरीरात सळसळत्या चैतन्याचा झरा आहे. ओज क्षयामुळे शरीरातील रोग प्रतिकार शक्ती क्षीण होते. यालाच प्रतिलोमक्षय असे म्हटले आहे. प्रतिलोम क्षय झालेल्या माणसाचा आजार शरीरात रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याने सहजासहजी बरा होत नाही. ह्या प्रतिलोम क्षयाचा प्रसार आजारी माणसाशी वारंवार निकटचा संबंध (गात्रस्पर्श) चुंबन, एकशय्या, सहभोजन, अनैसर्गिक संबंध यांच्यामुळे घडन येतो. वरील वर्णनावरून एड्स रोगाची व प्रतिलोम क्षयाची कारणे व लक्षणे सारखीच असल्याने एड्स म्हणजेच प्रतिलोमक्षय आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

आयुर्वेदामध्ये प्रतिलोमक्षयावर चिकित्सा देखील सांगितली आहे.
१) दूध, तूप, मांसरस इत्यादी पौष्टीक आहार घ्यावा.
२) ब्रह्मचर्याचे पालन करावे.
३) नैतिक मूल्याची शिकवण देणाऱ्या ग्रंथाचे वाचन व मनन करावे.
४) नाग भस्म + वंगभस्म हे या आजारावरील उत्तम औषध आहे.
‘नागस्तु नागशततुल्यबलं ददाति’ हे वाक्य प्रसिद्ध आहे. सुवर्ण भस्म व अभ्रक भस्म यांचाही चांगला उपयोग होतो. च्यवनप्राश, मेनॉल (Manoli) ही शक्तिवर्धक औषधे द्यावीत.

वरील पोस्ट फक्त माहिती म्हणून दिलेली आहे, कुठलाही उपचार करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या…

2 thoughts on “एड्स बद्दल आयुर्वेद काय म्हणते ?”

Leave a Comment