पोटातील आतड्यात ज्या कृमी होतात त्यास जंत असे म्हणतात. बहुत करून लहान मुलांच्या पोटात जंताचा विकार होतो.
निदान –
मळावाटे एखादा जंत पडणे हेच पोटात जंत झाल्याचे खात्रीचे लक्षण समजावे. इतर लक्षणामध्ये मुलांच्या पोटात दुखते पोट काहीसे मोठे व फुगून आलेले दिसते. केव्हा केव्हा मूल खा खा करते परंतु अन्न नीट पचत नाही. जुलाब होतात अथवा उलट्या ही होतात. मूल नाक चोळते. मलद्वाराच्या सभोवती खाज सुटते. मूल झोपेत दात खाते व दचकून उठतात. जंतामुळे कधी कधी झटके ही येतात. क्वचित खोकला येतो, चेहऱ्यावर चट्टे पडतात.
मनुष्याच्या आतड्यांत मुख्यत्वे करून ४ प्रकारचे जंत होतात.
१) गोल कृमी (Round Worms)
२) तंतू कृमी (Thread Worms)
३) चापट कृमी (Tape worms)
४) अंकुश कृमी (Hook Worms)
अ) गोल कृमी (Round Worms) –
हे कृमी ४ इंचापासून १० ते १५ इंच लांब असतात. दाभणा इतके लांब दंडगोल असतात. त्यांचा रंग पांढरा, पिळसर करडा, तांबूस असा असतो. साधारणपणे लहान मुलास फार होतात. ते लहान आतड्यात राहतात. लहान आतड्यातून ते केव्हा केव्हा आमाशयात येतात व वांती वाटे बाहेर पडतात. किंवा अन्ननलिकेतून श्वासनलिकेत येतात व नाकातून बाहेर पडतात. कधी कधी पित्तनलिकेत जाऊन स्त्रोताचा अवरोध करतात. त्यामुळे तीव्र कावीळ उत्पन्न होते. जंताच्या जुडग्यामुळे आंत्रावरोधही होतो. शौचावाटे अथवा कधी कधी ओकारीवाटे बाहेर पडतात. लोकांचा समज आहे की जंत जर अधिक पडले तर कमरेचा वेढा सुटेल व माणूस कमरेत अशक्त होईल, पण हा गैरसमज आहे.
ब) तंतू कृमी (Thread Worms)
हे कृमी बारीक दोऱ्यासारखे पांढरे व १ से. मी. लांबीचे असतात. हे कृमी लहान मुलांच्या मळात फार दिसून येतात. ते मोठ्या माणसास ही होतात. गुदद्वारांचे आतल्या बाजुने मोठ्या आतड्यात राहतात. त्यामुळे गुदद्वाराला खाज सुटते. झोपेत लघवी होते. झोपेत दात खाणे दचकणे व कधी कधी आंकडी येणे ही लक्षणे होतात.
क) चापट कृमी (Tape Worm) :
हे कृमी वादीसारखे चापट व फार लांब असतात. कधी कधी 15 फुटापर्यंत यांची लांबी असते. ते बहुत करून मोठ्या माणसांच्या पोटात होतात. ते शेकडो लहान लहान चौरस तुकड्यांनी बनलेले असतात. हे तुकडे तोंडाच्या बाजूस लहान लहान व मागच्या बाजूस मोठेमोठे होऊन गेलेले असतात. त्यातील प्रत्येक चौरस तुकडा हा स्वतंत्र कृमी असतो. चापट कृमीच्या तोंडास एखाद्या जाळ्याप्रमाणे आतड्यास चिकटून राहण्याचे साधन असते. त्यामुळे ते आतड्यास चिकटून राहतात. जेव्हा व्यक्तीला जंताच्या औषध दिले जाते, त्या वेळी त्यांचे निरनिराळे सांधे वेगळे होऊन शौचावाटे पडून जातात. जंताच्या तोंडाचा भाग आत राहिला तर तो चापट कृमी पुन्हा वाढू लागतो. त्याची लांबी वाढत जाते. औषधाने जेव्हा तोंडाचा भाग बाहेर पडेल तेव्हा चापट कृमीचा निकाल झाला असे समजावे.
ड) अंकुश कृमी (Hook Worm) :
अंकुश कृमी एक सेंटिमीटर लांब व त्याची अंडी पसरलेली असतात. त्याच्या अंड्याचा मानवी पेशीशी संबंध की ते त्वचेमध्ये शोषले जातात. (संडासमध्ये उघड्या पायाने प्रवेश करण्याचे टाळावे.) त्वचेमध्ये शोषले गेल्यानंतर रक्तामधून आतड्यांत प्रवेश करतात व तिथे त्यांची वाढ होते. त्यांच्या तोंडाशी अंकुशासारखे आतड्यात खुपसून राहण्याचे साधन असल्याने ते आतड्यात चिकटून राहतात.
आयुर्वेदिक औषधामध्ये –
१) कृमी मुद्गरस 1 gm. पाण्याबरोबर रात्री द्यावा.
२) कृमी कुठाररस 1gm. रात्री झोपताना गरम पाण्यात द्यावा.
३) कंपिल्ल चूर्ण 1 gm.
४) विडंग चूर्ण 1 gm. रात्री झोपताना द्यावे.
५) विडांगारिष्ट प्रत्येक वेळी चार चमचे दिवसातून तीन वेळा द्यावे.
वरील कुठलाही उपाय करण्या अगोदर किंवा दिलेली औषधे तज्ञांचा सल्ला घेऊनच घ्यावीत.