गजकर्ण/Ringworm

नायटे, दद्रु, दादर खरजेच्या नंतर माणसांना अधिक प्रमाणात त्रास देणारा त्वचा रोग म्हणजे गजकर्ण होय. शरीराच्या ओटीपोट, मान, जांघा, ढोपर, मांड्या, गूह्यभाग येथे त्याचा प्रसार होतो. सुरुवातील ते जांघा आणि जननेंद्रियावर दृष्टीस पडते. पुढे ते वाढत जाऊन मांड्या, ढोपर व ओटीपोटावर पसरत जाते.

पहिल्याने थोड्या भागात होऊन नंतर पसरत जाते. जेथे होईल तेथे वाटोळ्या आकाराचे व काठावर पुळ्या आलेले लहानसे चकांदळ तयार होते. त्या ठिकाणी त्वचा पहिल्याने लाल होऊन कांहीशी सुजून येते व तिच्यावरून पांढरा पापुद्रा निघतो तेथे अतिशय खाज येते. गजकर्णाची अशी अनेक मंडळे तयार होतात व त्यांचे काठ वरचेवर पसरत जातात. गजकर्ण पुष्कळ दिवस राहिले तर ते काळे पडते. खाज इतकी जोराची येते की, कितीही मन आवरले तरी खाजविल्याशिवाय राहवत नाही. खाजविल्यानंतर आग होते.

गजकर्ण डोक्यात ही होते. तेव्हा तेथील वर्तुळाकृती भागातील केस गळू लागतात. डोक्याप्रमाणेच भुवया हनुवटी व मान यावर ही गजकर्ण होते. काखेत व छातीवरच्या भागातही गजकर्ण दिसून येते. पायाच्या बोटात विशेषतः करंगळी व त्या शेजारचे बोटयांच्या सांध्यात हा रोग पसरतो. हाताचे पंजे व तळपाय यांच्यावरील त्वचेवर पुळ्या येतात. पुढे ती त्वचा राठ होते. गजकर्णाच्या या प्रकारास धोब्याचे गजकर्ण असे म्हणतात. गजकर्णाचे ठिकाणी खाजविल्याने त्याचे विषबीज नखात भरून राहते व दुसऱ्या ठिकाणी खाजवल्याने तेथे त्या विषबीजांचा स्पर्श होतो. इतर भागात त्याचा प्रसार होतो. गजकर्ण हा जंतूजन्य रोग आहे.

चिक्रित्सा :

गजकर्ण हा फारच चिवट व लवकर बरा न होणारा त्वचेचा आजार आहे. त्याच्यावर न कंटाळता उपचार चालू ठेवले तरच तो लवकर बरा होतो. सुरुवातीस जुलाब घेऊन कोठा साफ करून घ्यावा. त्वचा रोगाची सर्वसाधारण चिकित्सा सारखीच असते. त्वचेवर लावण्यासाठी मलम किंवा पावडर वापरू शकतो.

आयुर्वेदिक औषधे :

१) दद्रुघ्नीवटी दोन गोळ्या दिवसातून तीन वेळा.
२) चक्रमर्दन चूर्ण दिवसातून 1 ते 3 ग्रॅम दोन वेळा द्यावे.
३) महागंधक रसायन १ ते २ गुंजा पोटातून द्यावे.
४) पळसबीज चूर्ण + हळद + लिंबू रसातून लावणे.
५) मोरचूद + पापडखार + गंधक तुपात खलून लावणे.

वरील पैकी कुठलाही प्रयोग करण्याअगोदर तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

Leave a Comment