गर्भावस्थेमध्ये बाळ हे पूर्णतः आईच्या पोषणमूल्यांवर अवलंबून असते. जर आईचे वजन योग्य वजनापेक्षा कमी असेल तर बाळाला योग्य प्रमाणात आणि उत्तम प्रतीचे पोषण मिळत नाही आणि बाळाच्या वाढीला त्रास होतो. याउलट, आईचे वजन अतिप्रमाणात असल्यास गर्भाशयाकडे जाणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा येऊन बाळाच्या वाढीवर परिणाम होतो. आईने चुकीच्या पद्धतीने आहार घेतल्यास गर्भावस्थेमध्ये आईच्या तसेच बाळाच्या वाढीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे ‘ गर्भावस्थेमध्ये आहार कसा असावा ‘ हे जाणून घेणे गरजेचे आहे.
गरोदरपणातील आहार :(Pregnancy diet):
भारतामध्ये कुपोषित बालकांचे प्रमाण भरपूर दिसून येते. ज्या आईच्या आहारात अन्नघटकांची कमतरता आहे तिचे बाळ जन्माला येताना अपुरी वाढ, शारीरिक व्यंग / दोष, कुपोषित, जन्मदोष हे घेऊन येतात असे प्रकर्षाने दिसून येते. हे सर्व टाळण्यासाठी मुबलक आणि योग्य प्रमाणात अन्नघटक घेणे गरजेचे आहे.
गरोदरपणाच्या काळात आईला जास्त कॅलरीजची / उष्मांकांची गरज असते.
उदाहरणार्थ सर्वसाधारण स्त्रियांकरिता जर १८००-१९०० कॅलरीज असतील तर गरोदर काळात त्यापेक्षा ३५० जास्त कॅलरीज लागतात. बाळाच्या वाढीकरिता आणि शारीरिक हालचाली, बाळाला आईच्या शरीरातून रक्तपुरवठा आणि अन्न पोचवणारी नलिका (प्लासेन्टा) याच्या वाढीकरिता तसेच बाळाचे जास्त वजन पेलवण्याची क्षमता वाढण्याकरिता उष्मांकाची गरज असते. कार्बोहायड्रेटस् मधून अधिक उष्मांक मिळतात त्याकरिता ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, डाळी, कडधान्ये, दूध दुग्धजन्य पदार्थ, भाज्या, फळे यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करणे गरजेचे आहे. आहारात मैदा, बेकरी पदार्थ, अतिगोड पदार्थ टाळावेत.
प्रथिने(Protein):
गरोदरपणात ८२ ग्रॅम प्रतिदिन याप्रमाणे प्रथिनांची आवश्यकता असते. बाळाची वाढ, गर्भाशयाचे वाढते आकारमान, ॲमिनोटिक फ्लुइड यांकरिता प्रथिनांचा उपयोग होतो. उत्तम दर्जाचे प्रथिने शाकाहारींकरिता दूध , दही , ताक , पनीर , डाळी , कडधान्ये , ड्रायफ्रूट तर मासाहार करणाऱ्यासाठी अंडी, मांस, मासे यांमधून प्रथिने मिळतात. दररोज लोह (आयर्न) आणि फॉलिक ॲसिड आहाराच्या माध्यमातून मिळणे गरजेचे असते, हे आहारातून मिळणे शक्य नसेल तर सप्लिमेंटस् घेणे आवश्यक असते. गरोदरपणात जवळपास ३६ मि.ग्रॅ. लोह (आयर्न) तर ५०० मि.ग्रॅ. फॉलिक अॅसिडची गरज असते. आयर्नमुळे हिमोग्लोबिन (आई आणि बाळाचे), बाळाची बौद्धिक वाढ, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. फॉलिक अॅसिडमुळे जन्मजात दोष, गरोदरपणातील गुंतागुंत टाळण्यास मदत होते. त्याचबरोबर व्हिटॅमिन ‘ सी’ युक्त फळांमध्ये लिंबू, संत्र, मोसंबी, आवळा यांचा समावेश करणे गरजेचे आहे. स्वयंपाक करताना लोहाची भांडी वापरावीत. फॉलिक अॅसिडकरिता हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, गहू, बदाम हे आहारात घ्यावे.
कॅल्शियम(Calcium):
गरोदरपणात स्त्रीला १२०० मि.ग्रॅ. कॅल्शियमची आवश्यकता असते. बाळाची हाडे आणि दाताच्या (पुढील काळातील) उत्तम वाढीकरिता आवश्यक आहे. त्याकरिता आईने कॅल्शियमचे मुबलक प्रमाणात समावेश करणे गरजेचे आहे. गरोदरपणानंतर स्तन्यपानाकरिता देखील याचा उपयोग होतो. आहारात दूध, दही, ताक, पनीर, टोफू, तीळ, कडीपत्ता, कोथिंबीर घेणे गरजेचे आहे.
आहाराबद्दलच्या काही चुकीच्या समजुती आहेत (misconceptions about diet)
उदा. पपई – कच्ची पपई गरोदरपणात टाळावी कारण त्यात chypopapaine हा घटक असतो त्याने गर्भवती स्त्रीला धोका उद्भवू शकतो. पिकलेली पपई व्यवस्थित बिया काढून गर्भावस्थेतील १४ आठवड्यांनंतर आहारात घेतल्यास धोका नाही. अननसही कच्चा टाळावा. १४ आठवड्यांनंतर पिकलेला अननसाचे दोन – तीन तुकडे चालतात. अननस खाताना त्याच्यामधील कडक भाग काढून टाकावा. दही आणि ताक यातून उत्तम प्रतिची प्रथिने आणि कॅल्शियम मिळतात.क्क क्कड अड. आंबट आणि अतिथंड दही आणि ताक यांचे सेवन टाळावे. त्याऐवजी गोड, ताजे घेण्यास हरकत नाही. कुणाला वाटतं की हळद घालून दूध घेतल्यास बाळ गोरे जन्माला येते, तर ते चुकीचे आहे. आहार आणि बाळाचा वर्ण यांचा काहीही संबंध नाही. बाळाचा वर्ण हा पूर्णपणे आनुवांशिक आहे.
गर्भावस्थेत घ्यावयाची काळजी( Precautions to be taken during pregnancy)
- चौरस आणि सर्व अन्नघटकयुक्त आहार घेणे गरजेचे आहे.
- दोन खाण्यामध्ये जास्त अंतर ठेवू नये. थोड्या थोड्या वेळाने अन्न विभागून खावे.
- अति प्रमाणात चहा, कॉफी यांचे सेवन टाळावे.
- गर्भावस्थेत तंबाखू, धूम्रपान, मद्यपान टाळावे.
- नियमित आरोग्याची तपासणी वैद्यकीय सल्ल्याने करावी.
- डॉक्टरांच्या परवानगीने गरोदरपणातील व्यायाम महत्त्वाचा आहे.
- बाहेरील, उघड्यावरील अन्नपदार्थ, पॅकबंद पदार्थ पूर्णपणे टाळावे.
वरील पैकी कुठलाही प्रयोग करण्याअगोदर तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.