जशी प्रकृती तशी व्यक्ती

व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येक व्यक्तींमध्ये काही ना काहीतरी वैविध्य आढळतेच. जन्मापासून असणाऱ्या दोषांचा शरीर अवयवावर व मन, बुद्धी यावरही परिणाम घडतो. यामुळे उत्पन्न होणाऱ्या लक्षणांच्या आधारानेच त्या त्या व्यक्तींची प्रकृती ठरवता येते. वातप्रधान, पित्तप्रधान व कफप्रधान लक्षणे असणाऱ्या व्यक्ती त्या प्रकृतींच्या समजल्या जातात.

वातप्रकृती ( Vat Dosha )असेल तर…

वातप्रकृतींच्या व्यक्तींची शरीराची चण लहान असते. ही व्यक्ती सडपातळ असते. त्याचा वर्ण काळसर असतो. त्वचा अत्यंत रूक्ष असते. त्याचे दात वेडेवाकडे, तुटलेले, विषम आकाराचे असतात. केसही विरळ, कुरळे, घुसर रंगाचे खरखरीत असे असतात. अशा व्यक्तींना घाम कमी येतो. शरीराच्या विशेषत : हातापायांच्या हालचाली सतत चालू असतात. या व्यक्ती अत्यंत वाचाळ असतात. यांची झोपही थोडी व सावध असते. अशा या व्यक्ती सामान्यत: चंचल स्वभावाच्या, नास्तिक, दुसऱ्यांचा द्वेष करणाऱ्या व चैनी असतात. कोणत्याही बाबतीत स्थिरपणे विचार करणे वा एखादे काम पूर्ण करणे अशा व्यक्तींना शक्य होत नाही. वातप्रकृतीच्या व्यक्ती कुठल्या तरी रोगाने पीडलेल्या असतात त्या अल्पायू ठरतात.

पित्तप्रकृती ( Pitta Dosha ) असेल तर ….

पित्तप्रकृतीच्या व्यक्तींचा बांधा मध्यम असतो. त्या मुलायम त्वचेच्या असतात. गौरवर्णाच्या, सुकुमार असणाऱ्या या व्यक्तींच्या त्वचेवर तीळ अधिक असतात. त्वचा स्निग्ध व मृदु असते. अशा व्यक्तींना भूक अधिक लागते. खाईल ते पचवण्याची शक्ती यांच्यामध्ये असते. पित्तप्रकृतीच्या व्यक्ती तेजस्वी, मानी, शूर, पराक्रमी, सज्जन आणि बुद्धिमान असतात. यांना सहसा उष्ण पदार्थ आवडत नाहीत. मध्यम व दीर्घ आयुष्य यांना लाभते व हे आयुष्य सुखकर असे असते.

कफप्रकृती ( Kapha Dosha )असेल तर…

कफप्रकृतीच्या व्यक्ती बलवान, मांसल प्रमाणबद्ध बांध्याच्या असतात. भव्य रूंद कपाळ, भरदार उर, गोरी सतेल अंगकांती, स्निग्ध मृदु शीतस्पर्शी असणाऱ्या या व्यक्तींचे केसही दाट, काळेभोर, मृदु असे असतात. कफप्रवृत्तीच्या व्यक्तींचा स्वर गंभीर, स्निग्ध, मधुर व दुसऱ्यावर छाप पडेल अशा प्रकारचा असतो. या व्यक्ती सौम्य स्वभावाच्या, सात्त्विक, दयावान, चारित्र्यसंपन्न, उदार, शालीन, क्षमाशील असल्याने यांना अनेक मित्र असतात. या व्यक्ती सहसा कोणत्याही विकारांच्या अधीन होत नाहीत. सामान्यत : यांना दीर्घायु व सुखायु प्राप्त होत असते.

असा हा प्रकृतीचा माणसाच्या व्यक्तिमत्वावर परिणाम दिसत असतो.

1 thought on “जशी प्रकृती तशी व्यक्ती”

Leave a Comment