प्रकार एकचा (type -1) मधुमेह

प्रकार एकचा (type -1) मधुमेह आणि त्यापासून बचाव काही निकषांवरून कोणाला प्रकार एकचा मधुमेह(type -1) होण्याची शक्यता आहे हे शोधणे आता शक्य झाले आहे. पहिल्या प्रकारचा मधुमेह झाल्याचे अलीकडेच निदान झाले आहे अशा रुग्णाच्या भावंडांना मधुमेह होण्याची (त्यांच्यात स्वयं प्रतिपिंड असण्याची - ऑटो अँटीबॉडीज) जास्त शक्यता असते. रक्ताच्या एका चाचणीवरून हे कळू शकते. ज्यांच्या रक्ततपासणीत अशी प्रतिपिंडे सापडतात त्यांना काही महिन्यांपासून ते तीन वर्षांपर्यंत पहिल्या प्रकारचा मधुमेह होऊ शकतो. होकारार्थी चाचणी आलेल्या व्यक्तीवर उपाय करून भविष्यात होणारा मधुमेह टाळण्यात माफक यश आले आहे. निकोटीनामाइड, मधुमेहावरील लसी, अत्यल्प प्रमाणात इन्शुलिनचा वापर, इत्यादी प्रयोगांना मर्यादित यश आले आहे. या दिशेने आणखी संशोधन पुढे चालू आहे. ज्यांना पहिल्या प्रकारचा मधुमेह असल्याचे आधीच निदान झाले आहे अशांची त्यापासून सुटका होण्याच्या दृष्टीने उत्साहवर्धक प्रगती झाली आहे. पहिल्या प्रकारचा मधुमेह असल्याचे निदान झाल्याबरोबर चार आठवड्यांच्या आत जर इम्युनोसप्रेसिव्ह (प्रतिक्षमता दमनकारी) गोळ्या लवकरात लवकर सुरू केल्या तर अनेक रुग्णांची या मधुमेहापासून सुटका होणे (रुग्ण पूर्वस्थितीला येणे) शक्य असते. त्यांतील काही जणांना इन्शुलिन न देताही त्यांच्या रक्तातील साखरेवर एक वर्षाहून अधिक काळ नियंत्रण मिळवता येते. अनेक प्रकारच्या इम्युनोसप्रेसिव्ह गोळ्यांपैकी सायक्लोस्पोरीन या औषधाचे परिणाम सर्वांत उत्तम असल्याचे आढळून आले आहे आणि इतर इम्युनोसप्रेसन्ट औषधांशी त्याचा योग्य मेळ घालून त्याच्यात आणखी सुधारणा करता येऊ शकते. तथापि, ही औषधे अत्यंत महाग असून दीर्घकाळ वापर केल्यास त्यांचा विपरीत परिणाम होऊ शकतो. अगदी अलीकडच्या काळात इम्युनोसप्रेसन्टची, स्टिरॉइडसशी संबंधित नसलेली, नवीन औषधे आली असून त्यांचा यशस्वीरीत्या वापर करण्यात आला आहे आणि पहिल्या प्रकारच्या मधुमेहाच्या दहा मुलांमध्ये आयलेट पेशींचे प्रत्यारोपण करून, त्यांच्यावर अशा औषधांचे यशस्वीरीत्या उपचार करून त्यांना मधुमेहापासून एक वर्षाहून जास्त काळपर्यंत मुक्ती मिळाली आहे. (एका वर्षापेक्षा जास्त काळपर्यंत इन्शुलिनचा एकही थेंब न घेता त्यांची रक्तातील साखर संपूर्णपणे काबूत राहिली.) थोडक्यात म्हणजे पहिल्या प्रकारच्या मधुमेहाला प्रतिबंध करण्याबाबतचे चित्र दहा वर्षांपूर्वीपेक्षा जास्त आशादायक असले तरीही काही गंभीर अडचणी अजूनही आहेत आणि स्वीकारता येण्याजोगी, सुरक्षित आणि कमी खर्चाची प्रतिबंधक उपचार पद्धती येण्यासाठी आणखी एका दशकाचा काळ जाऊ शकेल. अर्थात आशादायक स्थिती आहे एवढे मात्र नक्की.

Leave a Comment