मधुमेहची लक्षणें

खालील लक्षणें जाणून येत असतील किंवा कुठल्या खालील परिस्थिती उदभवत असेल तर लगेच करून घ्या मधुमेहाची चाचणी…

मधुमेह ही व्याधी अशी आहे की बरेच महिने किंवा अगदी बरीच वर्षेसुद्धा त्याचे निदानच होत नाही. परंतु मधुमेहामुळे होणाऱ्या गुंतागुंतीच्या विकारांना आळा घालण्यासाठी त्याचे वेळीच तत्परतेने निदान होणे आणि रक्तातील साखरेवर वेळीच नियंत्रण ठेवणे अतिशय आवश्यक आहे.

१) अतिरिक्त तहान लागणे आणि/किंवा लघवीला वारंवार जावे लागणे, वजन कमी होणे, थकवा येणे, स्त्रियांना गुह्यजागी खाज येणे वा जखम होणे आणि पुरुषांच्या जननेंद्रियांच्या पुढच्या त्वचेला खाज येणे किंवा जखम होणे अशी लक्षणे असल्यास,

२) ज्यांना इसब/एक्झिमा यासारखा चर्मरोग झाला असेल (जो सहसा पावलाच्या वरच्या बाजूस आणि घोट्याच्या भोवती होतो,) वरचेवर गळवे होत असतील किंवा जखमा लवकर भरून येत नसतील अशी लक्षणे असल्यास;

३) उच्च रक्तदाब, हृदय रक्तवाहिन्यांचा विकार, परीघीय (Peripheral) न्यूरोपथी (ज्यामुळे हातापायाच्या तळव्यांना मुंग्या येतात किंवा बधिरपणा येतो,) पायांतील रक्तवाहिन्यांचे विकार (ज्यामध्ये पायांत वेदना होणे, चालताना पायांत गोळे येणे असे त्रास होतात) अशी लक्षणे असल्यास;

४) क्षयरोगाची बाधा झाली असल्यास;

५) एखाद्याला जर कमी वयात – म्हणजे पन्नाशीच्या आधी – मोतीबिंदू झाला असल्यास,

६) कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी;

७) स्त्रियांच्या बाबतीत प्रसूतीबाबतचा इतिहास चांगला नसल्यास, (म्हणजे कोणाला गर्भपात, मृत अर्भक, किंवा अति वजनदार अर्भक असा इतिहास असल्यास.

आणि शेवटी, वयाची तिशी ओलांडलेल्या प्रत्येक व्यक्तीने – ती जरी वरवर पूर्णपणे निरोगी असली तरीही – मधुमेहाची चाचणी करून घेतली पाहिजे. ज्या व्यक्तीला मधुमेहाचा निश्चित कौटुंबिक इतिहास आहे त्या व्यक्तीने दहा वर्षे आधीच म्हणजे वयाची बीस वर्षे ओलांडल्यानंतर मधुमेहाची प्रथम चाचणी करून घेतली पाहिजे.

या सगळ्या सूचनांच्या मागे एकच हेतू हा आहे की, मधुमेहाचे निदान लवकरात लवकर व्हावे, म्हणजे रक्तातील साखरेवर तत्परतेने नियंत्रण राखून अनेक गुंतागुंतीच्या व्याधी टाळता येतील. या कार्यपद्धतीमुळे काही रुग्ण मधुमेहाच्या उंबरठ्यावर आहेत असे निदान होईल आणि त्यामुळे रुग्णाला दूरदर्शीपणाने आणि शहाणपणाने आपली जीवनशैली निरोगी राखण्याची संधी उपलब्ध होईल आणि मधुमेह होण्यास आळा घालता येईल.

3 thoughts on “मधुमेहची लक्षणें”

  1. सर, खुप-खुप छान माहिती आपण देतात.याबद्दल आपले हार्दिक-हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹

    Reply

Leave a Comment