मधु-मेह…

दुसऱ्या प्रकारचा (type -2) मधुमेह होऊच नये यासाठी : तीस वर्षे वयानंतर प्रत्येक व्यक्तीने दर दोन वर्षांनी स्वत:ची उपाशीपोटीची आणि ७५ ग्रॅम ग्लुकोज पिऊन दोन तासांनंतरची रक्तातील साखर तपासून घ्यावी. रक्तातील साखर जर लक्ष्मणरेषेच्या आत पण तिच्या जवळ असेल (उदा. उपाशीपोटी ९८ मि.ग्रॅ. % आणि ७५ ग्रॅम ग्लुकोज घेतल्यानंतर १३७ मि.ग्रॅ. %) तर ही तपासणी दरवर्षी करून घ्यायला हवी आणि जर रक्तातील साखरेची पातळी उंबरठ्यावर असेल (prediabetes) तर दर सहा महिन्यांनी ही तपासणी करायला हवी.

कौटुंबिक इतिहास
ज्यांच्या सख्ख्या नातेवाइकांना मधुमेह असेल त्यांनी, स्थूल व्यक्तींनी आणि ज्यांना अकाली उच्च रक्तदाब आहे अशांनी आणि ज्यांना अकाली हृदयविकार आहे अशांनी वयाच्या तिसाव्या वर्षाची वाट न पाहता विसाव्या वर्षीच आपली पहिली रक्ततपासणी करून घ्यायला हवी.

नुकसान होण्यापूर्वीच…
मधुमेह असलेल्या बऱ्याच व्यक्ती ‘पक्क्या’ मधुमेही बनण्यापूर्वी आयजीटी अवस्थेतून (उंबरठ्यावरील मधुमेह) जातात. ही अवस्था किती काळ राहील हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते आणि हा काळ प्रत्येक व्यक्तीप्रमाणे बदलतो. आयजीटीची अवस्था अस्थिर असते आणि या अवस्थेत जर आहार आणि व्यायामाचे अतिशय काटेकोर व्यवस्थापन केले तर त्यांच्या रक्तातील साखर पुन्हा नॉर्मलला येऊ शकते. म्हणून अशा रुग्णांना लवकरात लवकर पूर्वस्थितीला आणणे अत्यंत गरजेचे आहे, कारण मोठ्या रक्तवाहिन्यांच्या विकाराचा धोका आयजीटी अवस्थेतच सुरू होतो.

वजनावर नियंत्रण
स्थूलता टाळता आली तर मधुमेह होण्याची शक्यता निश्चितच कमी होते. निरोगी आयुष्यात नियमित व्यायाम, आहाराचे सुयोग्य नियोजन आणि ताणतणाव टाळणे या गोष्टींचा समावेश होतो. स्वतःच्या शरीरात तयार होणारे इन्शुलिन, जास्त वजन असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत, नॉर्मल वजन असणाऱ्या व्यक्तींमध्ये अधिक कार्यक्षम ठरते. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर वजन नियंत्रणात ठेवल्याने, इन्शुलिनकडून त्या व्यक्तीला जास्त काम करून घेता येते आणि मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.

अर्भकाचे कुपोषण टाळा
फक्त तान्हेपणात किंवा बाल्यावस्थेतच नाही, तर गर्भाशयी अवस्थेत असतानाच पोषणाच्या दर्जात सुधारणा झाली तर कुपोषणामुळे होणारा मधुमेह टाळता येऊ शकतो. गर्भाशयी काळात तसेच तान्हेपणात व बाल्यावस्थेत प्रथिनांची कमतरता असल्यास बालकाच्या स्वादुपिंडातील बीटा पेशींवर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि भविष्यात मधुमेह होतो. हा काही प्रमाणात सामाजिक-आर्थिक प्रश्न असून भविष्यात ही परिस्थिती सुधारेल अशी आशा वाटते.

Leave a Comment