मानदुखी/स्पाँडिलोसिस या परिभाषिक अवघड शब्दाचे सोप्या मराठी भाषेतील सर्वांना समजेल असे नाव सांगायचे झाले तर मान आखडणे असे सांगता येईल पण या दोन प्रकारात थोडा फरक पडतो. तरुणपणात गाढ झोपेमध्ये मान अस्ताव्यस्त पडली किंवा मानेखाली वाजवीपेक्षा जाड उशी घेण्यात आली तर मानेचे मणके दुखावले जातात. जागे झाल्यावर मान अवघडल्यामुळे दुखु लागते. काही काळाने कसलाही उपचार न करता ते दुखणे थांबून जाते. स्पाँडिलोसिसमध्ये तसे होत नाही. दुखू लागलेली मान वळवता येत नाही. आजकाल साठी उलटलेल्या उतार वयातील सुशिक्षित व बुद्धीवादी लोकांच्या मानेभोवती गळपट्टे लावलेले दिसून येतात ते स्पाँडिलोसिसच्या उपचाराबद्दलचे असतात. दिवसेंदिवस या गळपट्टे धारकांची संख्या वाढत आहे. म्हणूनच या रोगासंबंधीची माहिती असणे आवश्यक आहे.
कंबरेतील ( कटि प्रदेशातील ) मणके शरीराच्या हालचालीत एकमेकांवर घासून झिजल्यामुळे जशी कंबर दुखीची शिकायत सुरू होते तशाच प्रकारे साठी उलटलेल्या माणसाचे मानेतील मणके झिजून जातात आणि स्पाँडिलोसिसच्या आजाराची सुरूवात होते. मानेच्या मणक्यातील सहाव्या व सातव्या मणक्यातील चकती सारखी घासल्यामुळे झिजून जाते. तिचा आकार बदलतो. पाठीच्या मणक्यामधून मेंदूपर्यंत पृष्ठवंश रज्जू जाण्यासाठी मणक्यांची जी सरळ पोकळी असते ती मणके झिजल्यामुळे सरळ राहात नाही. त्यामुळे मेंदूपर्यंत रक्ताचा पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. ज्ञानतंतूचा मेंदूपर्यंत निरोप ने-आण करण्याचे कामात ही अडथळा येतो. मेंदू आपले काम नीटपणे करू शकत नाही. त्यामुळे मुर्च्छा येते. रक्ताभिसरणास अडथळा येत असल्याने मेंदू लवकर थकतो. मेंदूवर अधिक ताण पडतो व भोवळ येते. वृद्धात हा आजार प्रामुख्याने झाल्याचे दिसून येते. निदान मान वळवण्यास अडथळा येणे व मान दुखणे यावरून रोग सहज ओळखता येतो. क्ष किरण तपासणी केली तर मग निदानास कसलीच अडचण पडत नाही.
लक्षणे –
मान वळवण्याचा प्रयत्न केला तर ती दुखते. मान ताठ झालेली असते.. मेंदूला रक्ताचा पुरवठा नीट होत नसल्याने मेंदू लवकर थकतो. मेंदू अधिक थकला तर मुर्च्छा येते.
उपचार –
मानदुखीच्या तीव्र अवस्थेमध्ये अंथरुणावर पडून भरपूर विश्रांती घ्यावी. डोक्याखाली उंच उशी घेऊ नये. मात्र अधिक दुखत असेल तर ट्रॅक्शन लावावे. गळ्याभोवती कॉलर ( गळपट्टी ) तीन महिने तरी सतत लावून ठेवावी. बौद्धिक श्रमाची कामे मर्यादित प्रमाणात करावीत. शक्यतोवर राग येऊ देऊ नये. नैतिक मूल्यांची शिकवण देणाऱ्या ग्रंथाचे वाचन करीत जावे. अधिक काळपर्यंत ताठ बसून रहावे लागणाऱ्या गोष्टी टाळाव्यात.
औषधोपचार-
काही काळासाठी वेदनाशामक औषधे घेऊ शकता मात्र यासाठी योगासन आणि पंचकर्म करून घेणे फायद्याचे ठरते.
१) नोव्हालजीन ( Novalgin ) दोन गोळ्या दिवसातून तीन वेळा द्याव्या. किंवा
२ ) फेनिल बुटाझोन ( Phenyl Butazone ) 100 mg प्रत्येक वेळी दोन गोळ्या दिवसातून तीन वेळा द्याव्यात किंवा
३ ) अलजेसिन ( Algesin ) 200 mg प्रत्येक वेळी दोन गोळ्या दिवसातून तीन वेळा द्याव्यात.
४ ) ॲसिटोमिनोफेन ( Acetaminophen ) 500 mg गोळी दिवसातून ४ वेळा द्यावी किंवा
५ ) ॲस्प्रिन ( Aspirin ) 100gm गोळी दिवसातून ४ वेळा किंवा
६ ) पायरॉक्सिकाम ( Pyroxicam ) 10 mg गोळी दररोज १ वेळा द्यावी किंवा
७ ) टोलमेंटीन ( Tolmentin ) 600 mg गोळी दिवसातून ३ वेळा द्यावी किंवा
८ ) आयबोप्रोकेन ( Iboprofen ) , केटोप्रोफेन ( Ketoprofen ) , डायक्लोफेनॅक ( Diaclofenac ) यापैकी एक गोळी दिवसातून २ वेळा द्यावी किंवा
९ ) निमुलीड ( Nimulid ) 100 mg गोळी दिवसातून २ वेळा द्यावी.
वरील लेख हा फक्त माहिती म्हनून आहे त्यामुळे वरील औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत…