मूत्रपिंडाचे (किडनीचे) स्थान पाठीमागच्या बाजूस खालच्या फासळीच्या आतल्या बाजूस आहे. मूत्रपिंडाचा आजार हा जलोदर, हृदयाचे रोग, पांडुरोग यासारख्या भयंकर रोगाचे मूळ कारण असणारा हा रोग आहे. मूत्रपिंडाच्या रोगात लघवीमधून अल्ब्युमिन नावाचा रक्तातील महत्वाचा पोषक घटक निघून जातो. त्याचप्रमाणे लघवीतून रक्त आणि मुत्रनळाच्या खरपुड्या बाहेर पडतात. मूत्रपिंडाच्या आजाराची दुसरी महत्वाची खूण म्हणजे अंगावर सूज येऊ लागते.
मूत्रपिंडाचा आजार सुरू होताच प्रथम थंडी वाजून ताप येतो. डोके दुखते, ओकारी येते, मूत्रपिंडाच्या ठिकाणी कुशीत आणि पाठीत वेदना भरून गेल्याप्रमाणे जड झाल्याची जाणीव होते. ज्या बाजूच्या मूत्रपिंडात होतात. कुशी बिघाड झाला असेल, त्या बाजूस वेदना होतात. वृषणामध्ये (अंडामध्ये) दुखावा होतो. वृषणाची गोळी वर चढून जाते. हालचाल केल्याने दुखावा अधिक होतो. तहान फार लागते. मलावरोध होतो. लघवी करण्याची वारंवार इच्छा होते. पण लघवी फारच थोडी आणि लाल अथवा तांबूस काळ्या रंगाची होते. मूत्रपिंडाच्या आजारात नंतर अंगावर सूज येऊ लागते. प्रथम डोळ्याच्या पापण्या सुजतात. चेहऱ्यावर सूज दिसू लागते. शरीर फिक्कट व पांढुरके दिसू लागते. नंतर पायावर सूज येते. पुढे हाताचे पंजे, पोट व जननेंद्रिय यांच्यावर सूज येऊन ती लठ्ठ होतात. सुजलेली जागा थंड असते. सुजेच्या जागी दाबले तर तेथे खळगा पडतो आणि दाब काढला की थोड्याच वेळात तो खळगा आपोआप भरून येतो. सुजेमध्ये जडपणा असला तरी वेदना नसतात.
मूत्रपिंडाच्या आजारातून रोगी बरा होऊ लागला म्हणजे प्रथम लघवी साफ आणि भरपूर होऊ लागते. आणि सूज उतरून जाते. एखाद्या रोग्यास दोन्ही बाजूच्या मूत्रपिंडास एकाच वेळी आजार झाला तर लघवी फारच थोडी होते. लघवीवाटे जे विषारी व निरुपयोगी पदार्थ बाहेर पडावयाचे असतात ते शरीरातच राहून जातात. त्यामुळे मूत्र विषारांची भयंकर लक्षणे दिसावयास लागतात. रोग्यास श्वासास, घामाचा आणि शरीरास लघवीचा वास येतो. रोगी गुंगीत पडून राहतो. बडबड करतो व बरळतो. स्मरणशक्ती नाहीशी होते. शेवटी तो बेशुद्ध होतो व एखादा झटका येऊन तो मरण पावतो.
उपाय: मूत्रपिंडाकडून जे कार्य व्हावयाचे असते ते होत नसल्यामुळे मूत्रल औषधे सुरुवातीस देऊ नयेत. सारक व घाम आणणारी औषधे द्यावीत. वाफारा द्यावा. दुखाव्याचे जागी शेक द्यावा. दुधाने लघवी साफ होते म्हणून दूध भरपूर प्रमाणात पिण्यास द्यावे. हलके व सहज पचेल असे अन्न खाण्यास द्यावे. शौचाला साफ होऊन जाण्यासाठी सोनामुखीची पाने व मनुका यांचा काढा देत जावा. रोग्यास आरामात ठेवून विश्रांती द्यावी. गरम कपडे वापरावेत. पाणी भरपूर पीत जावे.
आयुर्वेदिक औषधामध्ये-
१) पुनर्नवागुग्गुळ एक गोळी दिवसातून तीन वेळा द्यावी.
२) चंद्रकला रस एक गोळी दिवसातून तीन वेळा द्यावी.
३) चंद्रप्रभा एक गोळी दिवसातून तीन वेळा द्यावी.
४) त्रिवंगभस्म 150mg दिवसातून तीन वेळा द्यावे किंवा
५) सुवर्णराजवंगेश्वर 150 mg दुधाचे अनुपानातून दिवसातून तीन वेळा द्यावे.
६) हेमशिलाजीत 250mg नारळाचे पाण्यामधून दिवसातून दोन वेळा द्यावे.