शिशिरऋतूतील आहार विहार
शरदऋतू ( सप्टेंबर ऑक्टोबर ), हेमंतऋतू ( नोव्हेंबर डिसेंबर ) व शिशिरऋतू ( जानेवारी फेब्रुवारी ) या तीन ऋतूंत मनुष्याची प्रकृती ‘ निसर्ग अनुकूल असल्यामुळे, सुधारली पाहिजे. या दिवसांत प्रकृती सुधारत नसेल, दिवसेंदिवस शक्ती वाढत नसेल तर त्यावर वेळीच उपाय केले पाहिजेत. बाहेरच्या वातावरणामुळे शरीराची रंधे संकोच पावतात. त्यामुळे देहात उष्मा कोंडला जाऊन अग्नी प्रदीप्त होऊन भूक वाढते. त्यासाठी पचावयास जंड असे अन्नपदार्थ सेवन करावे लागतात. या दिवसांत भुकेच्या बेताने पौष्टिक पदार्थ, उदा. रव्याची, बदामाची खीर इ. अवश्य खावेत.
थंडीच्या दिवसांत खाण्यास योग्य असे पदार्थ पुढीलप्रमाणे आहेत.
गोड पदार्थ, गोडे ते लात तुपात तळलेले पदार्थ, गोडेतेल व तुपात घातलेले पदार्थ, साखर गुळाचे पदार्थ, आंबट गोड पदार्थ, आंबट खारट गोड पदार्थ, आंबट गोड फळे, उडदाचे वडे, उडीद पाक, दुधाचे दह्याचे पदार्थ ( बासुंदी , पेढे, श्रीखंड इ.), तळलेले गोड पदार्थ ( पुऱ्या, साटोऱ्या, कानोले, जिलबी इ. ) थंडीत थोडा मांसाहार केला तरी चालेल. अंगाला तेल लावून व्यायाम करावा, शेक घ्यावा, कोवळ्या उन्हात बसावे. थोडा घाम येऊ द्यावा. थंड वेळी बंद घरात असावे. दारे, खिडक्या फार उघड्या ठेवू नयेत. गरम कपडे घालावेत. कांबळी, ब्लँकेट वापरावीत. पिण्यासाठी, स्नानासाठी व वापरण्यासाठी कोमट ऊन पाणी उपयोगात आणावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी कस्तुरीप्रमाणे उष्ण सुगंधी पदार्थाचा वास घ्यावा अथवा सुंठ हुंगावी. कपड्यांना उष्ण सुगंध लावावेत.
थंडीच्या दिवसांत पुढील औषधे आरोग्यरक्षणासाठी वैद्यकीय सल्ल्यानुसार उपयोगी आहेत.
अष्टवर्ग, अगस्तिप्राश अश्विनीप्राश, बदामपाक अक्रोडपाक, काजू पाक, गूळ शेंगदाणे, शतावरीकल्प, सुवर्ण मालिनीवसंत, लघु मालिनीवसंत, सितोपलादिचूर्ण, द्राक्षासव, खर्जूरासव, द्राक्षारिष्ट, अश्वगंधारिष्ट, दशमूलारिष्ट वातकफात्मक प्रकृतीच्या लोकांनी गूळ व खजूर यापासून तयार होणारी आसवारिष्टे भूक वाढविण्यासाठी आहारात अवश्य वापरावीत. वातकफात्मक प्रकृतीच्या लोकांना ही थंडी बाधक होते. त्यांना सर्दी, पडसे, वारंवार होतो, म्हणून थंडीपासून प्रकृतीच्या वातकफात्मक लोकांनी आपली विशेष काळजी घ्यावी. थंडीवारा न लागेल अशी काळजी घ्यावी. टोमॅटो, लिंबू, दही इ. थंड लागणारे पदार्थ सेवन करू नयेत, खायचे झाल्यास हिंग, मिर इ. उष्ण द्रव्यांचा वापर करूनच सेवन करावेत.
गरम पाणीच प्यावे. हलके अन्न खावे, मधून मधून उपवास करून उष्णता वाढवावी. आल्याचा रस घ्यावा व हिरडे खावेत. डोके सर्व शरीराचे व इंद्रियांचे केंद्रस्थान आहे. त्याला, कानाला व हातापायांना थंडी न लागेल, अशी विशेष काळजी घ्यावी. गरम टोपी, कानटोपी वापरावी. रोज डोक्यावरून स्नान करू नये. हातमोजे, पायमोजे वापरावेत. थंडीच्या दिवसांत सेवन केलेले पौष्टिक पदार्थ जर चांगले न पचले तर ते कफदोष उत्पन्न करतात. तो कफदोष थंड वातावरणामुळे त्या दिवसांत बाधक होत नाही, पण पुढे वसंताचे ऊन पडू लागले की बाधक होतो. कफवातात्मक विकार करतो. तसाच तो पावसाळ्यातही बाधक होतो. कफवातात्मक विकार, दमा, खोकला इ. करतो म्हणून वसंतऋतू वा वर्षाऋतू बाधणाऱ्या लोकांनी हेमंत ऋतुचर्ये चे कटाक्षाने पालन करावे.
अश्या प्रकारे शिशिरऋतूमध्ये काळजी घ्यावी.
प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते त्यामुळे वरील माहिती वाचून कुठलाही प्रयोग करण्याअगोदर तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.