धनुर्वात ( TETANUS )

अत्यंत भयानक व प्राणघातक असा हा आजार आहे. जखमेतून धनुर्वाताच्या क्लोस्ट्रीडियम टिटॅनी (Clostridium Tetani) या जंतूचा प्रवेश झाल्याने रोग होतो. कधी कधी जखमेशिवाय ही हा रोग होतो. या रोगात स्नायूचा संकोच होतो. मधून मधून झटके येतात. धनुर्वाताचे जंतू घोड्याची लीद, शेणखत, केरकचरा, गोठे, गंजलेले लोखंड, घोड्याच्या पागा या ठिकाणी अधिक असतात. शरीरात नैसर्गिकपणे या रोगाविरूद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती नसल्यामुळे रोग प्रतिबंधासाठी लहान बाळास २ महिन्याच्या वयापासून एक – एक महिन्याच्या अंतराने डी.पी.टी. तिहेरी लसीचे (Triple) तीन डोस टोचावतात. दीड वर्षानंतर त्यास बुस्टर डोस देतात. तसेच ५ व्या वर्षी इंजेक्शन डी. टी. (D. T.) चा पहिला डोस द्यावा. पहिल्या डोसपासून एक ते दोन महिन्यात डी.टी. चा दुसरा डोस टोचावा. दुसऱ्या डोसपासून सहा ते बारा महिन्यात डी. टी. चा तिसरा डोस टोचावावा. नंतर प्रत्येक १० वर्षानंतर बुस्टर डोस देणे आवश्यक असते.

आजाराचे सुरुवातीस तोंडाचा जबडा जड पडत असल्याची जाणीव होते. चिडखोरपणा येतो. झोप येत नाही. त्यानंतर घसा दुखतो. मान ताठली जाते. तोंड उघडण्यास जड जाते. चेहऱ्यावरील स्नायू जखडल्याने चेहरा वेडावाकडा दिसतो. हळूहळू सर्व शरीराचे स्नायू जखडले जातात. झटके येणे सुरू होते. झटका आला की सर्व शरीर ताणले जाते. पाठीचा पोक होऊन ती धनुष्याप्रमाणे वाकडी होते. म्हणून या आजाराला ‘ धनुर्वात ‘ असे नाव पडले आहे. झटका येताना रोग्याला भयंकर त्रास होतो. थोड्या वेळाने झटका कमी होतो पण झटका आल्यानंतर आखडलेला स्नायू पूर्णपणे सैल सुटत नाही. कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या पिसाळी रोगात आणि कुचल्याचे विष पोटात गेल्यामुळे येणाऱ्या झटक्यात धनुर्वाताच्या झटक्याप्रमाणे झटके येतात पण पिसाळी रोगात येणाऱ्या झटक्यात पूर्वी कुत्रे चावले असल्याची माहिती मिळते. आणि कुचल्याचे विषापासून येणाऱ्या झटक्यात झटका निघून गेला की संपूर्ण शरीर सैल पडते तसे धनुर्वाताच्या आजारात घडत नाही. सुरेख जखमेपेक्षा चेंगललेल्या व चुरगळलेल्या घावाने किंवा गंजटलेला खिळा, सुई, काटा शरीरात घुसल्याने, भोसकल्याने, अंग भाजल्याने, प्रसूतीच्या वेळी जखम झाल्याने, बाळाचा नाळ अस्वच्छ शस्त्राने कापल्याने, जंतूचा प्रवेश होतो. मान व डोके जखडले जाते. जीभ बाहेर काढता येत नाही. तोंड उघडले जात नाही. खालचे व वरचे दात इतके जवळ येतात की त्यामधून अन्न जाणे कठीण होते. पाणी देखील आत जाणे अवघड जाते. ताप थोडासा असतो. शरीरावर घामाचे लोट चालतात. पोटाचे स्नायू लाकडाच्या फळीसारखे ताठ होतात. तहान फार लागते. रोगी शेवटपर्यंत शुद्धीवर असतो. रोग कष्टसाध्य आहे. रोगाचा काळ जितका अधिक असेल तितकी जगण्याची आशा अधिक असते. रोगी दहा दिवसापेक्षा अधिक काळ जगला तर बहुत करून तो दगावत नाही. रोगाचा उपचार करताना काळ वाढवण्याकडे लक्ष असू द्यावे.

आयुर्वेदिक औषधामध्ये –

१) अकांगवीर

२) ताप्यादिलोह

३) महावात विध्वंस

४) मल्लसिंदूर

५) समीर पन्नग यांचा वापर लक्षणाच्या अनुरोधाने योग्य त्या अनुपानातून करावा . स्नेहन, स्वेदन, बस्ति (तिळाचे तेलाचा) प्रताप लंकेश्वर २ ते ४ गुंजा दोन वेळा द्यावा.

वरील कुठलाही उपाय करण्याअगोदर किंवा औषधे घेण्या पूर्वी तज्ञांचा सल्ला घेऊनच घ्यावीत.

Leave a Comment