तक्रकल्प म्हणजे काय? कोणी करावे, आणि का?
गाईचे दूध विरजून कमी आंबट असणाऱ्या दह्यात तीनपट पाणी मिळवून रवीने घुसळून लोणी काढावे. लोणी काढलेले ताक सकाळ-संध्याकाळी भोजनानंतर साधारणतः एक ग्लास अथवा जमेल तेवढे ताक सतत पाच ते सात दिवस घ्यावे. तहान लागेल तेव्हा पाण्याऐवजी वरील प्रकारचे ताक घ्यावे. फक्त हात धुण्यासाठी व गुळण्या करण्यासाठीच पाण्याचा उपयोग करावा. आहारात भात, खिचडी, वाफवलेली भाजी तसेच मुगाची डाळ, भाकरी-पोळी असा साधा आहार घ्यावा. असे एक आठवडा करून दुसऱ्या आठवड्यात निम्मे लोणी काढून घ्यावे व दुसऱ्या आठवड्यात या ताकाचा प्रयोग करावा.
शरीराला मानवेल तेवढे ताकाचे प्रमाण वाढवीत जावे व अन्नाचे प्रमाण कमी करीत जावे. या प्रकारे ‘ तक्रप्रयोग ‘ करावा.
कमकुवत पचनशक्ती, अग्निमांदय व संग्रहणी यासारख्या रोगांत ‘ तक्रप्रयोगांने एक नवे जीवन प्राप्त होते. तक्र-प्रयोगाने अग्नी प्रबळ बनतो व रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ज्या रोगासाठी तक्रकल्प केला जाईल तो रोग वातजन्य असेल, तर ताकात सैंधव व सुंठ घालावी. जर रोग पित्तजन्य असेल, तर त्यात थोडी वेलची पूड व साखर घालावी. व रोग कफजन्य असेल, तर त्रिकटूचे चूर्ण घालावे. अर्श, अतिसार किंवा ग्रहणीमध्ये जिरे, मंद भाजलेला हिंग व सैंधव घालून ताकाचा प्रयोग करावा.
तक्र प्रयोग केव्हा थांबवावा
जेव्हा मळ बरोबर बांधून येईल, भूक बरोबर लागेल, तेव्हा तक्रकल्पाची समाप्ती करावी व हळूहळू ताकाचे प्रमाण कमी करीत जावे व अन्नाचे प्रमाण वाढवीत न्यावे. अशा प्रकारे तक्रप्रयोग पूर्ण करावा.
तक्रप्रयोग करताना घ्यावयाची विशेष काळजी…
जलपान, थंड वाऱ्याचे सेवन, अति भोजन, जागरणे, प्रवास, सूर्यताप, मिरच्या व मसाला, लसूण, उडीद, कडधान्ये, पचण्यास जड पदार्थ, स्त्रीसंग, मानसिक चिंता, परिश्रम, तैली पदार्थ, आंबट फळे, काकडी, नारळ हे पदार्थ अपथ्य समजावेत. ज्यांना आंबट ढेकर येत असतील, अम्लता जाणवत असेल, तोंडात व्रण पडलेले असतील त्यांनी तक्रप्रयोग करू नये. जर तक्रप्रयोगाने अस्वस्थ वाटले तरी तक्रप्रयोग बंद करावा. आयुर्वेदात लोणीयुक्त ताक, लोण्याशिवायचे ताक किंवा कमी अधिक पाणी मिळलेले ताक यावरून ताकाचे प्रकार पडतात.
वरील प्रयोग तज्ञांचा देखरेखी खाली करावा…