वसंतऋतूतील ( फेब्रुवारी – मार्च ) आहार – विहार कडक थंडी संपून जे ऊन सुरु होते तोच हा वसंत ऋतू. थंडीच्या दिवसात भूक जास्त लागते. गोड पदार्थ, दूध, दही व गोड आंबट फळे भरपूर खाण्यात येतात. त्यामुळे शरीरात कफाचा संचय होतो. पण थंड हवेमुळे तो कळून येत नाही. वसंत ऋतूचे ऊन पडू लागताच तो कफ पातळ झाल्याने वाढतो. त्यामुळे भूक एकाएकी मंद होते. आणि अनेक विकारांस प्रारंभ होतो. विशेषत : कफ प्रकृतीच्या लोकांना वसंत ऋतू बाधक ठरतो. कफ प्रकृतीच्या लोकांनी थंडीच्या दिवसांत व वसंत ऋतूत आरोग्याचे नियम पाळले नाहीत तर त्यांना पुढील पावसाळ्यात व हिवाळ्यातही कफाची व वाताची ( दमा खोकल्याची, आमवात, संधिवात ) बाधा होऊ लागते. सबंध वसंत ऋतूतील आहार – विहार पुढे सांगितलेले नियम, कफ प्रकृती माणसांनी काटकोरपणे पाळावेत.
वसंत ऋतूत कफ प्रकोप होऊन पुढील विकार होतात.
सतत पोट भरल्यासारखे ( तृप्ती ) वाटते. सुस्ती, झोप फार येते. काहीही करण्याची इच्छा होत नाही. हात पाय जड वाटतात, आळस येतो, तोंड गोड पडते. तोंडाला पाणी सुटते. तोंडावाटे कफ पडतो. कान, नाक, डोळे यांतून घाण जास्त येते. छातीत, हृदयात जड वाटते. घशात चिकटा येतो, रक्तदाब वाढतो. गालगुंड होतात. अंगात चरबी वाढते. अंगावर पित्त उठते. अंग पांढरे भासते, डोळे, लघवी मळ पांढरट दिसतो व थकवाही जाणवतो. लहान मुले विशेषत: कफकारक दुधाचा आहार करीत असल्यामुळे या दिवसांत देवी, गोवर, कांजण्या, गालफुगी, अतिसार वांत्या इ. रोगांनी पीडित होतात व त्यांना तापही येतो. हे सगळे विकार कमी करण्यासाठी पुढील उपचार करावेत.
वसंत ऋतूत पुढील उपचार करावेत.
वेखंड, पिंपळी, ऊनपाणी इ. उष्ण पदार्थ पिऊन वांती करावी. अश्वकंचुकी, इच्छाभेदी इ. तीक्ष्ण औषधांचे सेवन करावे त्यामुळे पोट साफ होते. वेखंड वगैरे तीक्ष्ण औषधांनी नस्य करावे. तीक्ष्ण औषधांच्या धुरी घ्याव्यात. तीक्ष्ण औषधांच्या काढ्यांच्या गुळण्या कराव्यात. या ऋतूत सकाळी व्यायाम करावा. अंगाला उटणे लावावे. मध सेवन करावा. जव, गहू, खावे. बागेतून फिरावे, स्नान करून चंदन, अगरू आदींचे सुगंधी लेप अंगाला लावावेत. पिप्पल्यासव, कुमारीआसव अशी जुनी औषधे सेवन करावीत. या दिवसांत पाण्यात नागरमोथा, सुंठ, असाणा, शिसव, यांच्या लाकडाच्या गाभ्यांचा चुरा ( तेलिया असाणा भरड ) वा मध पाण्यात टाकून ते पाणी प्यावे. जड अन्न खाऊ नये. फ्रीजमधील पदार्थ खाणे वर्ज करावे. आंबट पदार्थ व अधिक गोड पदार्थ खाणे वर्ज्य करावे. खाण्यात रूक्ष ( भाजके ) पदार्थ ठेवावेत. तिखट, कडू व तुरट रसाचे पदार्थ खावेत. खाण्याच्या गोड आंबट खारट पदार्थावर तिखट तुरट कडू संस्कार करावेत. दररोज पळणे, उड्या मारणे, पोहणे असा व्यायाम करावा. रूक्ष उटणे अंगाला लावावीत. थोडक्यात जुना मध खाणे, द्विदल धान्ये उकडून खाणे, गरम पाणी पिणे, वांती करणे, उपवास, गुळण्या करणे हे सर्व प्रकार वसंत ऋतूत करावेत म्हणजे ऊन्हाचा त्रास होत नाही. थोडीशी विश्रांतीही आवश्यक आहे. या ऋतूत सकाळी व रात्री १/१ चमचा अगस्तिप्राश सेवन करावा. हिरड्याचा, जांभळीचा मध खावा. दिवसा झोपू नये. वमन – या कालात शरीरात कफदोष फारच वाढला असेल आणि त्यामुळे कफाचे रोग झाले असल्यास प्रथम सात दिवस वाढत्या प्रमाणात ( अडीच तोळे या प्रमाणापासून सुरुवात करून ) तूप घ्यावे. आठव्या दिवशी रात्री दही भात खावा. सकाळी ‘ आकंठ दूध पिऊन नंतर मदनफलंबीजचूर्ण १ मासा अधिक ज्येष्ठमध २ मासे आणि वेखंडचूर्ण ३ मासे मधातून खावे. या औषधाने, लगेच उलटी होते व वाढलेला कफ उलटीतून पडून जातो. यालाच वमन किंवा उलटी करून टाकणे असे म्हणतात.
अश्या प्रकारे वसंत ऋतूमध्ये काळजी घ्यावी.
प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते त्यामुळे वरील माहिती वाचून कुठलाही प्रयोग करण्याअगोदर तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.