वर्षाऋतूत (पावसाळ्यात) हवा ओलसर व थंड असते. कपडेही ओलसर राहतात. आकाशातील ढगांमुळे सूर्यदर्शन होत नाही. पाणी गढूळ असते. यात पालापाचोळा पडून ते आंबूस होते. या सर्वांचा परिणाम म्हणून पावसाळ्यात भूक मंदावते. म्हणून अग्नी (भूक) तेजस्वी राहील, असेच पदार्थ ( अन्न पाणी ) सेवन करावे. या ऋतूच्या प्रारंभी बस्ती ( एनिमा ) घ्यावा. तांदूळ, गहू ही धान्ये एका वर्षांची जुनी वापरावीत. निरनिराळ्या डाळींची पातळ वरणे, आंबट पदार्थ व मीठ घालून आणि हिंगजिऱ्याची फोडणी देऊन घ्यावीत. जेवणापूर्वी हिंगाष्टक चूर्ण किंवा आले आणि मीठ खावे.
अन्नपचन चांगले राहण्यासाठी, मुरलेले ( जुने ) कुमारीआसव, कुटजारिष्ट, पंचकोलासव, भल्लातकासव यासारखे एखादे अग्निवर्धक पाचक ( २ ते ४ चमचे ) आसव अरिष्ट पिण्याच्या पाण्यात मिश्र करून जेवताना किंवा दिवसातून २/३ वेळा घ्यावे. पातळ ताकात भरपूर पादेलोण व आले सुंठ घालून ते प्यावे. तुरटी लावून व उकळून स्वच्छ केलेले पाणी प्यावे. हवा विशेष कुंद असेल त्या वेळी पचावयास हलके, कोरडे व आंबट, खारट, ( तैलयुक्त ) अन्न सेवन करावे. स्निग्ध गारव्यापासून आपले रक्षण करावे पावसाळ्यात ( वर्षाऋतूत ) कांदे खाऊ नयेत. लसूण खावा.
दुधीभोपळा, मात्र पडवळ या भाज्या खाव्यात. उष्ण सुगंधी वस्तू वापराव्यात. गार कपडे घालू नयेत. कपडे शेकून व उदाची धुरी दिल्यावर वापरावेत. या दिवसांत दिवसा झोपू नये. संयम पाळावा. अतिश्रम करू नयेत. ज्यांची भूक मंद रहात असेल त्यांनी रसोनवाटी, शंखवटी, दीपक गुटी, पाचकगुटी, कुबेरवटी, संजीवनगुटी यांपैकी १ ते २ गोळ्या जेवणापूर्वी, जेवणामध्ये अगर जेवणानंतर पचनासाठी घ्याव्यात. लिंबाच्या रसात गरम पाणी, पादेलोण व थोडा हिंग घालून ते घ्यावे, गोडीसाठी मध वापरावा.
सुंठ, मिरे, पिंपळी, पुदीना यांचा आहारात वापर करावा. आलेरस, लिंबूरस, मिरेपूड, हिंग व पादेलोण एक करून ‘ पाचकरस ‘ ठेवावा. तो गरम पाण्यात मिसळून घ्यावा. पिण्याचे पाणी करून उकळून, गाळून किंवा तुरटी फिरवून संथ ठेवून मगच वापरावे.
अश्या प्रकारे वर्षाऋतूमध्ये काळजी घ्यावी.
प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते त्यामुळे वरील माहिती वाचून कुठलाही प्रयोग करण्याअगोदर तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
चांगली माहिती आहे, आभार.