शरदऋतूतील ( सप्टेंबर आक्टोबर ) आहार विहार
शरदऋतूत दिवसांत सूर्याची किरणे तीक्ष्ण असतात. याला ऑक्टोबर हीट या नावाने ओळखतात. यापूर्वीच्या वर्षाऋतूत शरीरात पित्तदोषाचा संचय झालेला असतो. या ऋतूमधील कडक उन्हाळ्याने सर्वांच्याच शरीरातील पित्तदोष एकदम वाढतो. त्यामुळे अनेक लोकांना शौचास व लघवीस फार पिवळे होणे, भूक व तहान फार लागणे, अंगाचा दाह होणे, झोप कमी लागणे, पोटात आग पडणे, तसेच रक्तवृध्दीची लक्षणे देखील उत्पन्न होतात. अंगावर पित्त उठणे, त्वचा लालसर दिसणे, डोळे लाल होणे, अंगावर गळवे उठणे, त्वचा विकार होणे, दातांच्या हिरड्यांतून रक्त येणे, अंगावर व तोंडावर काळे डाग येणे व भूक मंद होत जाणे ही लक्षणे उत्पन्न होतात.
पित्तप्रकोप व रक्तवृध्दी कमी करण्यासाठी प्रथम कडू औषधी वनस्पती घालून तयार केलेले तूप ( महातिक्तक घृत ) ३-४ दिवस घ्यावे व नंतर गोड रसाचे व थंड गुणाचे विरेचन ( सौम्य जुलाबाचे औषध उदा. स्वादिष्टविरेचन चूर्ण, आरग्वध इ. ) घ्यावे. ज्यांच्या शरीरात रक्तवृध्दीची लक्षणे दिसत असतील. त्यांनी वरील उपायाशिवाय योग्य चिकित्सकाकडून शिरेतून रक्त काढून घ्यावे. म्हणजेच रक्तदान करावे. प्रत्येक तरूण मनुष्याने शरदऋतूत ३५० सी.सी. रक्तदान अवश्य करावे. खाण्याचे व पिण्याचे पदार्थ थंड व पचावयास, हलके असावेत. त्यात काही कडू, गोड व तुरट चवीचे पदार्थ असावेत. जुने तांदूळ, जुने गहू, ज्वारी, मूग, साखर, मध, आवळे, आवळकाठी, पडवळ, तोंडली, मनुका, आमसुले, डाळिंब व दुधी इ. पदार्थ सेवन करणे या ऋतूत चांगले असते.
वाढलेल्या पित्तासाठी मोरावळा, गुलकंद, डाळिंबपाक, चंद्रपुटी प्रवाळभस्म, मौक्तिक भस्म, कनमदुधा ( मौक्तिक युक्त ), उशीरासव, चंदनासव, चंद्रकला, आरोग्यवर्धिनी इ. इतरही उपचार करावेत. पाणी दिवसा तापवून व रात्री चांदण्यात ठेवून ते दुसरे दिवशी प्यावे. स्वच्छ, पांढरी व वजनाने असलेली वस्त्रे हलकी वापरावीत. अंगाला चंदन, वाळा, कापूर यांचे लेपन करावे. संध्याकाळी व रात्री मोकळ्या हवेत थोड्यावेळ तरी जावे.
शरदऋतू ऋतूत पुढील गोष्टी वर्ज्य कराव्यात.
पोटभर खाणे पिणे, दही खाणे, उन्हात जाणे, मीठ, लसूण, चरबी, तेल, तीक्ष्ण मद्ये दिवसाची झोप घेणे.
अश्या प्रकारे शरद ऋतूमध्ये काळजी घ्यावी.
प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते त्यामुळे वरील माहिती वाचून कुठलाही प्रयोग करण्याअगोदर तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.