ASTHMA / दमा

दम्याचे आजारामध्ये श्वासोच्छ्वासाची क्रिया जलद चालते यावरून हा रोग ओळखता येतो. सामान्यतः हा रोग मोठ्या माणसात आढळतो. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये याचे प्रमाणे अधिक असते. अनुवंशिकताही आढळून येते. स्थलांतर झाले, जेवण अधिक झाले तर रोगाची सुरूवात होते. हिवाळ्यात किंवा हवा कुंद असली तर याची सुरूवात होण्याची शक्यता असते. रोगास बहुत करून तारुण्यावस्थेत प्रारंभ होतो. दमेकरी माणसास दमा सुरू होण्यास छोटेसे कारण ही पुरेसे होते धुर घशात गेल्याने दम्याची सुरूवात होते. मिरच्याची अथवा दुसऱ्या कशाची झोंबणारी धुरी, दुर्गंधी व धुळ श्वासोच्छ्वास करताना फुफ्फुसात गेल्याने दम्याची सुरूवात होते. दमा सुरू होण्याचे कारण माणसा माणसातील प्रकृतीमाना प्रमाणे भिन्न असते. कोणास उन्हाळ्यात, कोणास हिवाळ्यात तर कोणास पावसाळ्यात दम्याच्या आजाराचा त्रास होतो. पण साधारणपणे घाण हवेमुळे, पोटात अन्न अधिक झाल्याने, आतड्यात मळ खच्चून भरल्याने, विशेषतः रात्री अधिक जेवल्याने दमा सुरू होतो.

दम्याचा आवेग सुरू होताना रोग्याच्या पोटात जडपणा वाटतो. डोके दुखते, लघवी पुष्कळ आणि सावकाश होते. रात्री २-३ वाजण्याचे सुमारास श्वास घेण्यास अडचण झाल्याने रोगी एकाएकी जागा होतो. छाती आवळून टाकल्यासारखी वाटते व तिच्यात हवेचा प्रवेश होत नाही, असा भास होतो. रोगी जोराने श्वांस घेऊ लागतो. रोग्याची स्थिती फार दुःखदायक दिसते, श्वास घेण्याचे कामात गुंतल्याने त्यास बोलण्यापुरतीही विश्रांती मिळत नाही. तो चिंतातूर व मोठ्या संकटात पडला असावा असे वाटते, शरीरावरून घामाचे थेंब पडतात, शरीर गार पडते, नाडी जलद चालते, तोंड उघडलेले राहते, डोके वर धरलेले असते, थोडासा खोकला येतो, निजल्याने अथवा बसल्याने ही आराम वाटत नाही, दमा कमी होण्यासाठी रोगी एखादे वेळी उभा राहतो, अथवा कोपरे टेकून समोर तक्क्यावर डोके ठेवून आराम वाटण्याचा प्रयत्न करतो, अथवा उघड्या खिडकीत तासचे तास उभा राहतो. खुली हवा विपूल प्रमाणात घशात गेल्याने त्यास थोडे बरे वाटते. म्हणून खुली हवा मिळण्यासाठी त्याचा प्रयत्न असतो. एक दोन तासात दमा हळूहळू कमी होतो. खोकला येतो व त्या बरोबर थोडासा कफ पडतो दमा बसून गेला म्हणजे रोग्यास झोप लागते. तो जागा होऊन उठतो. त्याला त्याची छाती व पाठ दुखत असल्याचे समजून येते, दम्यामध्ये भात्यासारखी चालत राहिल्याने तिला फार श्रम झालेले असतात.

वायुनळीच्या संकोचापासून दमा झाला असेल तर हवा आत जाताना सारंगीसारखा ध्वनी होतो. आत घेतलेला श्वास आखूड आणि बाहेर सोडलेला श्वास लांब असतो. एकदा दमा होऊन बरा झाला की तो पुन्हा कधी उलटेल याचा नेम सांगता येत नाही. पुन्हा पुन्हा आल्यावाचून तो बहुत करून रहात नाही. या रोगाची सुरूवात बहुत करून रात्रीचे वेळी होते. दमा फिरून उलटे पर्यंत रोग्याची स्थिती अगदी चांगली निरोगी असते. बहुतेक दमेकरी शरीराने नेहमी अशक्त असतात. त्यांच्या छातीची हाडे बाहेर निघालेली असतात. बोटाची नखे डंबेल सारखी उभारून आलेली दिसतात. गालफाडे बसलेली असतात. थोडा बहुत खोकला असतो. कफ पडतो व घसा वाजतो.

चिकित्सा-
दम्याचे आजारावर दोन प्रकारची उपाय योजना करावी लागते. पहिला उपाय म्हणजे जेव्हा दम्याचा त्रास होत असेल म्हणजे दम्याचा उठाव झाला असेल तेव्हा औषधे व इंजेक्शने देऊन त्याला शांत करण्याचा उपाय करावा. आणि दुसरा उपाय म्हणजे जेव्हा दमा शांत झालेला असेल तेव्हा आखीव स्वरूपाच्या (ठराविक) आहार विहाराने दम्याचा उठाव होऊ न देण्याचा उपाय करावा लागतो. दम्याने पछाडलेल्या माणसाने कितीही पथ्याने वागण्याचा प्रयत्न केला तरी काही तरी चूक घडते व दम्याचा उठाव होतो. दम्याचा आजार पुष्कळ अंशी असायज (प्रकृतीस न मानवणे) विकार असल्याने दम्याचे उपचारातील अडचण अशी आहे की औषध अथवा उपचार सर्वांना सारखा लागू पडत नाही. कोणते औषध व उपचार कोणाला लागू पडेल ते अनुभवानेच ठरवावे लागते.

आयुर्वेदिक औषधामध्ये – प्रथम गंधर्वहरितकी २ चमचे रात्री झोपताना द्यावे किंवा स्वादिष्ट विरेचन चूर्ण दोन चमचे कोमट पाण्याबरोबर द्यावे नंतर

१) श्वासकुठार गोळी 250mg

२) चतुर्भुज कल्प 150mg
३) हेमाभ्र सिंदूर रस 150mg मध किंवा तुळशीच्या पानांचा रस यामधून दिवसातून तीन वेळा देत जावा.
४) सितोपलादी चूर्ण 250mg + मृगश्रृंग भस्म 125 mg + सुवर्ण औषधे एकत्र मिसळून प्रत्येक वेळी 250mg प्रमाणे दिवसातून तीन वेळा माक्षिक 125mg + जेष्ठमध चूर्ण 500mg + अभ्रकभस्म 125mg हा सर्व मधातून द्यावे.
५) वासकासव अथवा
६) श्रृंग्यादिक्वाथ प्रत्येक वेळी दोन चमचे प्रमाणे दिवसातून तीन वेळा देत जावा.

हवा दम्याचा उठाव कमी झाल्यानंतर तो पुन्हा उठाव करणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी आहार विहाराचे नियम काटेकोरपणे पाळावेत. आणि पाणी यांच्यातील बदल सुध्दा दम्याच्या उठावाला कारणीभूत होतो. म्हणून हवेत आणि पाण्यात शक्य तो बदल होऊ देऊ नये. वेळेवर जेवण घेत जावे. जैन लोकाप्रमाणे सूर्यास्ताचे पूर्वी जेवण करण्याचा परिपाठ ठेवावा. थोडीशी भूक शिल्लक ठेवूनच जेवण आटोपते घेत जावे. कोणत्याही परिस्थितीत अपरात्री जेवण करू नये.

वातुळ, आंबट व तेलकट पदार्थ खाऊ नयेत, रात्रीचे जाग्रण करू नये. थंड हवेपासून बचाव करावा. दम्याचा आजार असलेल्या माणसाने डॉक्टरांच्या सल्ल्याने इफिड्रिनच्या गोळ्या नेहमी जवळ बाळगाव्यात व दम्याचा आवेग सुरू होण्याचे लक्षण दिसून येताच त्यांचा उपयोग करावा.

वरील पैकी कुठलाही प्रयोग करण्याअगोदर तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

Leave a Comment