Malaria

मलेरिया

थंडीताप, हिवताप

मलेरिया हा सर्व लोकांच्या परिचयाचा रोग आहे. या आजारातील थंडी व ताप या दोन प्रमुख लक्षणावरून ‘थंडीताप’ अथवा ‘हिवताप’ ही नावे या आजारास पडली आहेत. या आजारात प्रथम थंडी नंतर ताप व शेवटी घाम असा क्रम असल्याने तो चटकन ओळखणे सोपे जाते. डासांच्या मार्फत या आजाराच्या १) प्लाजमोडियम व्हायव्हॅक्स २) प्लाजमोडियम फाल्सीपेरम जंतूचा माणसाच्या रक्तात प्रवेश होतो व तेथे त्यांची वाढ होते व हिवतापाचा आजार सुरू होतो. थंडीतापाची पाळी सुरू होण्याच्या काळात लागणाऱ्या अवधीवरून थंडीतापाचे प्रमुख असे तीन पोटविभाग पडले आहेत.

१) दररोज चोवीस तासातून एकदा ठराविक वेळी थंडी वाजून ताप भरतो त्याला ‘ संतत ‘ असे म्हणतात.

२) एक दिवस आड म्हणजे ४८ तासांतून एकदा ठराविक वेळी थंडी वाजून ताप भरतो त्यास ‘ तृतीयक ‘ अथवा ‘ एकांतरा ‘ असे म्हणतात.

३) दोन दिवसा आड म्हणजे ७२ तासानंतर एकदा ठराविक वेळी थंडी वाजून ताप भरतो त्यास ‘ चतुर्थक ‘ अथवा ‘ चौधारी हीव ‘ असे म्हणतात. ज्वराची पाळी येण्याचा क्रम मात्र सारखाच असतो. ज्वराची पाळी यावयाची असली म्हणजे प्रथम अंग गळून जाते व मनास अस्वस्थता वाटते. जाभळ्या येतात.

ज्वराच्या पाळीच्या तीन अवस्था असतात.

१) शीतावस्था

२) ज्वरावस्था

३) घर्मावस्था

१) शीतावस्था –

सुरूवातीस अंगावर रोमांच उभे राहतात. कोणाला जांभया येतात, सर्व अंग कापत राहते. थडथडून हीव येते. कितीही पांघरूण घातले तरी अंगाचे थडथडणे बंद होत नाही. दात थडथड वाजतात. हातापायाचे पंजे गार पडतात . एखादा तासभर ही शीतावस्था राहते.

२) ज्वरावस्था –

शीतावस्था नंतर ज्वरावस्था सुरू होते. ताप १०३ ते १०५ अंश फॅरनहाअिट पर्यंत चढतो, तळहात व तळपाय गरम होतात. अंगाची तलखी होते, चटके बसण्याइतके अंग गरम लागते. डोके दुखते, एखाद्यास पित्ताच्या ओकाऱ्या होतात. लघवी कमी होते. लघवीचा रंग पिवळा अथवा लालसर असतो.

३) घर्मावस्था –

सर्वसाधारणपणे १-२ तासानंतर तिसऱ्या व शेवटच्या होते. सर्वांगाला घाम येतो. नाडीचा वाढलेला वेग कमी वाजून घर्मावस्थेस सुरूवात होतो. ताप उतरून जातो व माणूस मोकळा होतो. काही दिवसांनंतर थंडी येण्याच्या ठराविक वेळेत बदल होतो. औषधोपचार न केला तर कित्येक महिने हा क्रम चालू राहतो. आजार पुष्कळ दिवस राहिला तर फिक्कटपणा येतो. पानथरी वाढते. व एखाद्यास कावीळ होते. थंडी, ताप व घाम हा क्रम घडत असल्याने रोग ओळखणे अवघड जात नाही. रक्ताची तपासणी करून रोग ओळखता येतो. पण रक्ततपासणीचे अगोदर क्विनाईन (Quinine) घेतलेले असेल तर रक्तात कृमि सापडत नाहीत.

आयुर्वेदिक औषधामध्ये:-

१) महांज्वरांकुश

२) त्रिभुवनकीर्ती

३) अमृतारिष्ट

४) सुदर्शनचूर्ण

५) आरोग्यवर्धिनी यांचा उपयोग करावा लक्ष्मीनारायण रस १ गुंज दिवसातून तीन वेळा द्यावा.

आहार विहार – विश्रांती घ्यावी, पोट साफ ठेवावे, आहार हलका घ्यावा वातुळ पदार्थ व थंड पाण्याचे स्नान वर्ज्य करावे.

वरील माहिती ही फक्त माहिती म्हणून असून दिलेली औषधे किंवा कुठलाही प्रयोग करण्याअगोदर तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Comment