ग्रीष्म ऋतूतील ( एप्रिल मे ) आहार विहार ग्रीष्म ऋतूत ( एप्रिल मे मध्ये ) ऊन कडक पडते. त्यामुळे शरीरातील कफदोष क्षीण होतो. कफ क्षीण करणारी कारणे टाळावीत. या दिवसात गोड, हलके, स्निग्ध, थंड व पातळ अन्न खावे. या दिवसांत धान्याची पेज घेणे उत्तम आहे. थंड पाण्याने स्नान करावे साखर पाणी मिसळून सातूचे पीठ घ्यावे. या दिवसांत तिखट कमी खावे. अती आंबट पदार्थ खाऊ नयेत. मद्य सेवन करू नये. चंदन, आदी वाळा कडू शीत द्रव्यापासून केलेली आसवे अगर सरबते खूप पाणी मिसळून घ्यावीत.
उदा. चंदनासव, उशीरासव वगैरे. थंड दूध, साखरभात, पातळ भात खावा. फळांचे पातळ रस घ्यावेत. तांदूळ, साबुदाणा, शेवया, गव्हले व रवा यांच्या खिरी सेवन कराव्यात. म्हशीचे दूध चांदण्यात ठेवून थंड करून साखर घालून प्यावे. आंबराई, द्राक्षांचा बगीचा यांत उन्हाच्या वेळी बसावे. अंगाला चंदन लावावे. घरात निळसर हिरव्या रंगाचे पडदे लावावेत. गळ्यात कापराच्या, मोगऱ्याच्या फुलांच्या माळा घालाव्यात. गुलकंद, वासाकंद, मोरावळा, कमलकंद, डाळिंबपाक, वाळा सरबत, चंदन सरबत, चंद्रपुटी, प्रवाळभस्म, मौक्तिक भस्म, चंद्रकला, चंदनासव, उशीरासव, कर्पूरादिवटी, गोदन्तीभस्म, मोहराभस्म, गुळवेलसत्व, स्वास्थ्यासाठी घ्यावीत.
सर्व ऋतूंत घेतलेली दुपारची झोप कफ पित्त वाढवणारी ठरते. पण ग्रीष्म ऋतूमधील दुपारची झोप आरोग्यदायक असते. ग्रीष्म म्हणजे कडक उन्हाळा. वसंत ऋतू पासून ऊन तापू लागते. पण त्या ऋतूत शीत आहारविहार बाधाकारक – होतात. १५ एप्रिल पासून मात्र तोपचार बाधक ठरत नाहीत. ज्यांची वातकफ प्रकृती नाही अशांनी या माठातील पाणी प्यावे. तसेच चंदन, कापूर, वाळा पाण्यात टाकून त्या थंड पाण्याचा वापर करावा. ग्रीष्मामध्ये उष्णता वाढत असते. म्हणजेच वातदोष संचित होतो. या दिवसांत सर्वांनाच कमी झोप लागते, कृशता येते, थकवाही वाढतो.. या स्थितीचा विचार करून ह्या ऋतूत स्वास्थ्य संरक्षणासाठी शीतोपचार तर सुखावह आणि हितावह होणारच. त्याबरोबर मधुर व सौम्य आम्ल अशा रसांच्या पदार्थाची अत्यंत आवश्यकता असते. या दिवसांत आंबा आरोग्याला उपयुक्त आहे. सर्वसाधारण आहाराबरोबर मधुर व सौम्य आम्ल पदार्थांची जोड अत्यावश्यक आहे. यासाठी पन्हे, रायते, सरबते घ्यावीत.
पचन शक्तीप्रमाणे आहाराचे सेवन करावे. लवण रसाचा ( मीठ ) चवीपुरताच उपयोग करावा, म्हणजे स्वास्थ्यसंरक्षणकायति त्याचा अडथळा होणार नाही. या ऋतूत भूक मंद होत असते. म्हणून किंचित अम्ल असलेले पदार्थ आहारात अवश्य असावेत. तिखट कमीत कमी असावे. एका वेळी जास्त न जेवता ३-४ वेळा थोडे थोडे भोजन करावे. जागरण, श्रम, ऊन टाळावे. दुपारी शीत वातावरणात वेळ घालवावा. रात्री झोप घ्यावी. प्रदूषण नसलेल्या हवेत फिरायला जावे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनःक्षोभ टाळावा. हलके पांढऱ्या रंगाचे पातळ कपडे अंगावर घालावेत.
अश्या प्रकारे ग्रीष्म ऋतूमध्ये काळजी घ्यावी.
प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते त्यामुळे वरील माहिती वाचून कुठलाही प्रयोग करण्याअगोदर तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.