थकवा नावाचा शत्रु उत्साह नावाचा मित्र

बहुतांश वेळा आपल्या दिवसाची सुरवातच थकव्याने सुरु होते. झोपून उठले तरी आळस आणि कंटाळा आलेला असतो. दमल्याची भावना असते, मग काय दिवसभर आपण जांभळ्या देत रहातो. दिवसभरातील आपली कामे रेंगाळत करतो. ही सारी लक्षणे थकव्याची आहेत. सतत थकवा येण्याची अनेक कारणे असतात. त्यात आपण श्वासोच्छवास कसा करतो इथपासून ते अनेक बाबींचा समावेश होतो. त्याची कारणे समजावून घेऊन काही उपाययोजना अमलात आणणे आवश्यक असते. अपुरी झोप अनेक आजारांना निमंत्रण देते. अनेक जण आपल्याला चार किंवा पाच तासांची झोप पुरते असे म्हणतात. बळेबळेच उठून कामाला लागतात. कालांतराने त्यांची प्रकृती त्यांना विश्रांती घेण्यास भाग पाडते. हे टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे पुरेशी झोप घेणे. परिपूर्ण आहार न घेणे. हे एक थकव्याचे प्रमुख कारण आहे. भारतात लोहाची कमतरता महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात असते, असे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आपल्याकडे अॅनिमिया होणाऱ्या महिलांचे प्रमाणही मोठे आहे. रक्तातील लोहाचे प्रमाण योग्य नसेल तर अॅनिमिया होतो. लोहामुळे रक्तातील लाल पेशींमध्ये हिमोग्लोबीन तयार केले जाते. फुफ्फुसाकडून ऑक्सिजन घेऊन सर्व शरीरभर पसरविण्याचे काम हिमोग्लोबीन करीत असते. हिमोग्लोबीन तयार होण्याचे प्रमाणच जर कमी असेल तर शरीरभर ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळू शकत नाही. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला चिडचिड होते सतत थकवा येतो, थोड्याशा कामानेही दमायला होते. म्हणूनच परिपूर्ण आहार घ्यावा. महिलांच्या बाबतीत मेनॉपॉजच्या काळात रक्तातून लोह जाण्याचे प्रमाण वाढते. अधिक लोहाची गरज असते. अशा वेळी लोह पोटात जाणारे पदार्थ खावेत. त्यांना या काळात चहा किंवा कॉफी यांचे प्रमाण जरी जास्त झालं तरी थकवा येतो. पिणाऱ्यांपेक्षा कॉफी पिणाऱ्यांची अवस्था कठीण होते, कारण कॉफीत कॅफेन नावाचा घटक असतो, तो दुधारी तलवारीसारखा असतो. रक्तातील साखरेचे प्रमाण एकदम वाढविण्याचे काम तो करतो आणि ते एकदम कमी करतो. दोन्हीही बाबी आरोग्याला अपायकारकच असतात. त्यामुळे कॉफी पिणाऱ्यांनी दिवसाला दोन कपांपेक्षा जास्त हे पेय घेणे अहितकारक आहे. चहा किंवा कॉफीच्या अतिसेवनाने निद्रानाश, थकवा येऊ शकतो. तंबाखू कोणत्याही स्वरूपात खाणे किंवा ओढणे, दारू पिणे, इतर कोणत्याही व्यसनाच्या अधीन होणे यामुळेही थकवा येऊ शकतो. वरवरचा श्वास घेतल्यामुळे शरीरातील ऑक्सिजन आणि कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण बिघडते. खोल आणि संथ श्वास घेण्याची सवय प्रयत्नपूर्वक लावून घेतली तरी आपण अधिक उत्साही राहू शकू.

आपण व्यायाम पुरेसा करीत नाही. ज्या प्रमाणात आपल्या शारीरिक हालचाली व्हायला हव्यात, या प्रमाणात त्या होत नाहीत. त्याचा परिणाम म्हणूनही थकवा येतो. ॲरोबिक्स हा व्यायामप्रकार सर्वाधिक फायद्याचा ठरणारा असतो. कारण या व्यायामानंतर आपण अधिक ऑक्सिजन घेतो. थकवा दूर पळवून लावण्याचे ते महत्त्वाचे हत्यार आहे. म्हणूनच किमान पथ्ये आपण पाळली तर थकवा नावाचा शत्रू आपल्याजवळ थांबणार नाही आणि उत्साह नावाचा मित्र आपल्याला सोडून कधीच जाणार नाही.

Leave a Comment